Countries to Avoid Travelling: जगभरात कोविड-19 रुग्णांमध्ये वाढ; नवीन वर्षात टाळा 'या' 7 देशांमधील प्रवास
संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी नवीन वर्षात अनेक देशांमध्ये प्रवास निर्बंध लादले जाण्याची अपेक्षा आहे.
जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतामध्येही कोविड-19च्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. अशात नववर्षाच्या स्वागतासाठी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठीही अॅडव्हायझरी येऊ लागल्या आहेत. असे म्हटले जात आहे की, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एखाद्या सहलीचे नियोजन करताना किमान सात देश असे आहेत जिथे प्रवास करणे तुम्ही टाळले पाहिजेत. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी नवीन वर्षात अनेक देशांमध्ये प्रवास निर्बंध लादले जाण्याची अपेक्षा आहे.
सध्या परदेशी प्रवास टाळण्यात चीन अव्वल आहे. देशात संक्रमणाची विक्रमी संख्या नोंदवली जात आहे. बीजिंगने जवळजवळ तीन वर्षांपासून लागू असलेले निर्बंध अचानक उठवल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांत सुमारे 250 दशलक्ष लोकांना (लोकसंख्येच्या 18 टक्के) कोविड-19 ची लागण झाली असल्याचा अंदाज चिनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता भारतासह विविध देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे.
सध्या जपानमध्ये दररोज 2 लाखांहून अधिक नवीन कोविड प्रकरणे नोंदवली जात आहेत, त्यामुळे हा देशही प्रवासाच्या यादीत नसावा. जपानच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, देशात एकाच दिवसात कोविड-19 विषाणूमुळे 371 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, जो 2020 मध्ये साथीचा रोग सुरू झाल्यापासून एका दिवसातील सर्वात जास्त आकडा आहे. जपान महामारीच्या आठव्या लाटेचा सामना करत आहे.
अमेरिकेतही कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. देशात गेल्या 28 दिवसांत 15 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 21 डिसेंबर रोजी कोविड प्रकरणांची एकूण संख्या 100 दशलक्ष ओलांडली. यूएस मधील वाढत्या इन्फ्लूएंझा आणि आरएसव्ही प्रकरणांसह कोरोना यूएस आरोग्य प्रणालीवरील भार आणखी वाढवू शकतो. (हेही वाचा: कोरोनाच्या उद्रेकानंतर चीन मधील परिस्थिती पुन्हा पूर्ववत, पहा निर्बंधांसह बिजिंगमधील नागरिकांचं न्यू नॉर्मल; Watch Video)
दक्षिण कोरियामध्ये 23 डिसेंबर रोजी एका दिवसात 68,000 हून अधिक कोविड प्रकरणे नोंदवली गेली. ख्रिसमस वीकेंडमध्ये कमी चाचण्यांमुळे सोमवारी देशाने 25,545 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची पुष्टी केली, ज्यात परदेशातील 67 जणांचा समावेश आहे, एकूण रुग्ण संख्या 28,684,600 झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्राझीलमध्येही कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, तर जर्मनीमध्ये गेल्या काही दिवसांत दररोज 40,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. फ्रान्समध्येही गेल्या 28 दिवसांत 10 लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत आणि प्रकरणांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे यंदा नवीन वर्षात या देशांमध्ये प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये 26 डिसेंबर रोजी 196 कोविड रुग्णांची नोंद झाली.