CM Yogi Adityanath Temple: अयोध्येत बांधले जाणार 101 फूट उंचीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भव्य मंदिर; 24 फेब्रुवारीला भूमिपूजन
Yogi Adityanath | (Photo Credits: Facebook)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोध्येत (Ayodhya) मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. यासह रामनगरीत हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. मंदिराच्या बांधकामासोबतच आता अयोध्येत मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी (CM Yogi Adityanath) यांचे मंदिरही बांधले जाणार आहे. साधारण 101 फूट उंचीच्या या मंदिरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 5 फूट 4 इंचाचा पुतळा बसवण्यात येणार आहे.

योगींचे प्रचारक प्रभाकर मौर्य हे मंदिर बांधणार आहेत. मंदिराचे भूमिपूजन 24 फेब्रुवारीला होणार असून, आचार्य सत्येंद्र दास या भूमीचे पूजन करणार आहेत. यावेळी हनुमानगढीचे पुजारी राजू दास आणि अयोध्येतील अनेक ज्येष्ठ संत सहभागी होणार आहेत.

या मंदिराची लांबी आणि रुंदी 50×50 असेल. हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रभाकर मौर्य यांनी सांगितले की, ते त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे मिळालेले पैसे या मंदिरासाठी खर्च करत असून, अनेक मुस्लिम संघटनांचे लोकही मदत करत आहेत. अयोध्येतील कल्याण भदरसा गावातील मजरे मौर्या पूर्वेला हे योगी मंदिर बांधले जाणार आहे.

मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही निमंत्रण पत्र पाठवण्यात आले आहे. यासोबतच अयोध्येतील अनेक ज्येष्ठ संतांना भूमिपूजनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पत्रे देण्यात आली आहेत. हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 5 वर्षे लागतील. देवाप्रमाणेच मंदिरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी योगी आदित्यनाथ यांच्या मूर्तीची पूजा केली जाईल आणि संध्याकाळी आरती देखील होईल.

या मंदिराबाबत रामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, ‘ही एक श्रद्धा आहे. प्रभाकर मौर्य हे सीएम योगी यांचे परम भक्त आहेत व म्हणून ते त्यांचे भव्य मंदिर बांधणार आहेत. आम्हाला 24 फेब्रुवारी रोजीच्या भूमिपूजनाचे निमंत्रण मिळाले असून आम्ही त्यात सहभागी होणार आहोत.’ (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधीत उद्योगपतींचे प्रसारमाध्यमांवर नियंत्रण, राहुल गांधी यांचा घणाघात)

याआधी प्रभाकर मौर्य यांनी वादग्रस्त जमिनीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंदिर बांधले होते, त्यावरून त्यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर प्रशासनाने मंदिराला टाळे ठोकले होते. आता मौर्य स्वतःच्या जमिनीवर हे मंदिर उभारत आहेत. मौर्य यांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ यांच्या मंदिराच्या उभारणीसाठी 24 फेब्रुवारीला 12:20 च्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे.