Bihar: बिहारच्या बराहियामध्ये चक्क 'रसगुल्ल्या'साठी 40 तास रेले रोको आंदोलन; अनेक गाड्या रद्द, 100 गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल
या संपूर्ण प्रकरणावर रेल्वेने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले
रसगुल्लामुळे (Rasgulla) बिहारमध्ये (Bihar) तब्बल दोन दिवस रेल रोको करण्यात आला होता. हे ऐकून थोडे आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहे. बिहारमध्ये गाड्या रद्द होण्याचे हे रंजक प्रकरण सध्या चर्चेत आहे. रसगुल्ल्यामुळे डझनभर गाड्या रद्द कराव्या लागल्या तर सुमारे 100 गाड्यांचा मार्ग वळवावा लागला. रेल्वेकडून आश्वासन मिळाल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत होऊ शकली. बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील बरहिया रेल्वे स्टेशनवरील ही घटना आहे.
या स्थानकावर 10 गाड्या थांबवण्याच्या मागणीसाठी रसगुल्ला व्यापाऱ्यांनी सुमारे 40 तास आंदोलन केले. स्थानिक लोकांनी रेल्वे रुळावर तंबू ठोकल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे हावडा-दिल्ली मार्गावरील गाड्यांची वाहतूक सुमारे 40 तास प्रभावित झाली होती. एवढेच नाही तर 74 गाड्यांचे संचालनही स्थगित करावे लागले.
बरहिया येथील रसगुल्ला खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या अप्रतिम चवीमुळे लांबून लोक याठिकाणी रसगुल्ला खाण्यासाठी येतात. येथील रसगुल्ल्यांचा पुरवठा आजूबाजूच्या जिल्ह्यांव्यतिरिक्त आसपासच्या राज्यांमध्येही केला जातो. येथे रसगुल्ल्याची 200 हून अधिक दुकाने आहेत, जिथे रोज हजारो रसगुल्ल्यांची विक्री होते. परंतु इतर राज्यांत जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांना बरहिया स्थानकात थांबा नाही. त्यामुळे येथील मिठाई व्यापाऱ्यांना रेल्वेने अन्य राज्यांत रसगुल्ल्याचा पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. (हेही वाचा: नर्सने रुग्णाला रक्त चढवण्यासाठी घेतली लाच; दिले लाल औषधात मिसळले ग्लुकोज)
या कारणास्तव बरहिया स्थानकात 10 गाड्या थांबविण्याच्या मागणीसाठी मिठाई व्यापाऱ्यांनी आंदोलन केले. लखीसरायचे जिल्हा दंडाधिकारी संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने लोक स्टेशनवर रुळांवर बसले होते आणि अनेक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची त्यांची मागणी होती. या संपूर्ण प्रकरणावर रेल्वेने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबले. एका एक्स्प्रेसला थांबा देण्याचे आश्वासन रेल्वेने दिले आहे. याठिकाणी कोणती ट्रेन थांबणार हे रेल्वेकडून अद्याप कळू शकलेले नाही.