Bengaluru Cyber Fraud: बेंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरची 2.24 कोटी रुपयांची सायबर फसवणूक; कस्टम्स आणि एनसीबी अधिकारी असल्याचे भासवून केला होता फोन
त्यांनी सांगितले की ते सीमाशुल्क विभागाचे आहेत आणि शिवकुमारच्या नावाने 16 पासपोर्ट, 58 एटीएम कार्ड आणि 140 ग्रॅम एक्स्टेसी टॅब्लेट असलेले पार्सल सापडले आहे, जे मलेशियाहून दिल्लीला पाठवण्यात आले आहे.
Bengaluru Cyber Fraud: आजकाल दररोज सायबर फसवणुकीची (Cyber Fraud) प्रकरणे समोर येत आहेत. सरकार वेळोवेळी याबाबत जनजागृती करत आहे, मात्र तरीही शिकले-सवरलेले लोकही अशा फसवणुकीला बळी पडत आहेत. नुकतेच हायटेक सिटी बंगळुरू (Bengaluru) येथील 52 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरची सायबर ठगांनी 2.24 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी दिल्ली कस्टम आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी असल्याचे भासवून ही फसवणूक केली.
अहवालानुसार, 18 मार्च रोजी फसवणूक करणाऱ्यांनी शिवकुमार या सिनिअर सॉफ्टवेअर अभियंत्याला फोन केला. त्यांनी सांगितले की ते सीमाशुल्क विभागाचे आहेत आणि शिवकुमारच्या नावाने 16 पासपोर्ट, 58 एटीएम कार्ड आणि 140 ग्रॅम एक्स्टेसी टॅब्लेट असलेले पार्सल सापडले आहे, जे मलेशियाहून दिल्लीला पाठवण्यात आले आहे.
त्यानंतर हा कॉल दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यात आला, ज्याने स्वतःची ओळख एनसीबी अधिकारी म्हणून करून दिली. याने शिवकुमारला पुढील संवादासाठी स्काईप डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी शिवकुमारला या प्रकरणाबाबत घाबरवले आणि त्यातून जर बाहेर पडायचे असेल, तर आपल्याला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. समोर कस्टम आणि एनसीबी अधिकारी असल्याचे समजून शिव’कुमारही पैसे पाठवण्यास तयार झाला. (हेही वाचा: Ahmedabad: क्रिप्टोमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 29.90 लाखांची फसवणूक, आरोपीचा शोध सुरु)
पीडितेने 18 ते 24 मार्च दरम्यान रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) आणि इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS) द्वारे आठ हप्त्यांमध्ये 2.23 कोटी हस्तांतरित केले. त्यानंतर 5 एप्रिलला शिवकुमारला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर त्याने बेंगळुरू ईशान्य सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, एप्रिलच्या सुरुवातीपासून एकट्या बेंगळुरू ईशान्य कार्यक्षेत्रात एकूण 25 लोकांची अंदाजे 4 कोटी रुपयांची अशी फसवणूक झाली आहे.