Assam Horror: नको त्या स्थितीत आढळलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून सेप्टिक टँकमध्ये फेकले, 3 महिन्यानंतर घटना उघड
त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अखेर या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला.
आसामच्या (Assam) नागाव (Nagaon) जिल्ह्यात एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला महिलेच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पत्नीच्या दुसऱ्या पुरुषासोबत असलेल्या अवैध संबंधाबाबत पतीला माहिती मिळाल्यानंतर, पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून त्याची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, पतीच्या हत्येनंतर मृतदेहाचे कथितपणे अनेक तुकडे केले गेले आणि ते शौचालयाच्या सेप्टिक टाकीमध्ये टाकण्यात आले. जवळपास तीन महिन्यांनंतर ही घटना उघडकीस आली. जिल्ह्यातील नागावमधील कालियाबोर येथील कुथोरी परिसरात ही घटना घडली.
नागावच्या पोलीस अधीक्षक लीना डोले यांनी आयएएनएसला सांगितले की, उमेश बोरा असे मृत व्यक्तीचे नाव असून तो व्यवसायाने सुतार होता. तो बंगळुरूमध्ये राहत होता व तिथेच काम करायचा. साधारणपणे दोन-तीन महिन्यांच्या अंतराने तो त्याच्या घरी जात असे. दरम्यान, त्याची पत्नी रीटा बोरा हिचे मुजीबूर रहमान या व्यक्तीसोबत संबंध प्रस्थापित झाले. सुमारे तीन महिन्यांपूर्वी उमेश बेंगळुरूहून घरी परतला तेव्हा त्याला त्याची पत्नी आणि मुजीबूर नको त्या स्थितीत दिसले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर उमेश आणि रीटामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याचवेळी रिटा आणि तिचा प्रियकर मुजीबूर यांनी उमेशचा गळा आवळून तिथेच त्याचा खून केला. त्यानंतर, त्यांनी अटकेपासून बचाव करण्याची योजना आखली. उमेशच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते सेप्टिक टँकमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर रीताने इतरांना कळवले की, उमेश अजूनही बेंगळुरूमध्येच आहे आणि तो परतला नाही. (हेही वाचा: बायकोला मित्रासोबत पाहून नवऱ्याचा फिरला माथा, झाडाला बांधून केली बेदम मारहाण)
परंतु, अनेक दिवसांपासून उमेशचा पत्ता न लागल्याने त्याच्यासोबत काहीतरी गडबड झाली असावी, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर अखेर या प्रकरणाचा उलगडा होऊ लागला. पोलिसांना संशय आला आणि झडती घेतली असता शौचालयाच्या सेप्टिक टँकमध्ये एक सांगाडा आढळला. त्यानंतर त्यांनी आम्ही रीटा बोरा आणि मुजीबुर रहमान यांना गुरुवारी अटक केली. या प्रकारांचा पुढील तपास सुरु आहे.