Arogya Sandesh: रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार बाजारात आणणार ‘आरोग्य संदेश’ मिठाई; जाणून घ्या खासियत
दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. अनेक शास्त्रज्ञ, डॉक्टर्स याबाबत लस अथवा ठोस औषध शोधण्याचा प्रयत्नात आहेत, मात्र सध्या तरी या विषाणूशी लढा देण्यासाठी, उत्तम रोग प्रतिकारशक्ती (Best Immunity) हा एक महत्वाचा उपाय ठरू शकतो.
कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीने भारतामध्ये उग्र रूप धारण केले आहे. दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना संक्रमित रुग्ण समोर येत आहेत. अनेक शास्त्रज्ञ, डॉक्टर्स याबाबत लस अथवा ठोस औषध शोधण्याचा प्रयत्नात आहेत, मात्र सध्या तरी या विषाणूशी लढा देण्यासाठी, उत्तम रोग प्रतिकारशक्ती (Best Immunity) हा एक महत्वाचा उपाय ठरू शकतो. अशात ज्यांना बंगाली मिठाई आवडतात त्यांच्यासाठी कोविड-19 च्या साथीच्या काळात एक चांगली बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगाल सरकार (West Bengal Government) बाजारात आगळा वेगळा ‘संदेश’ (Arogya Sandesh) हा मिठाई प्रकार बाजारात आणण्याची तयारी करीत आहे. यामध्ये सुंदरवन मध वापरण्यात येणार आहे, जो रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करेल.
पशुधन संसाधन विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, गायीच्या दुधापासून बनवलेल्या छेन्नामध्ये सुंदरबन येथील मध मिसळून ‘आरोग्य संदेश’ बनवला जाईल. यामध्ये तुळशीचा अर्कही देखील घातला जाणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम गोष्टी वापरल्या जाणार नाहीत. कोलकाता आणि शेजारच्या जिल्ह्यांतील विभागाच्या विक्री केंद्रांमधून हा आरोग्यदायी ‘संदेश’ विकला जाईल. मंत्री मंतूराम पाखिरा म्हणाले की, आरोग्य संदेश बनवण्यासाठी पिरखली, झारखली आणि सुंदरबनच्या इतर भागातून शास्त्रोक्त पद्धतीने मध संकलित करुन साठवला जाईल.
(हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या महारोगापासून बचाव करण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातील काही खास टीप्स)
येत्या दोन महिन्यांत हा संदेश बाजारात आणला जाईल आणि त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी असणार आहे. दरम्यान, यापूर्वी कोलकाता येथे मिठाईच्या एका प्रतिष्ठित स्वीटचेनने बाजारात एक विशेष ‘संदेश’ आणला होता. हा संदेश शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतो, असा दावा त्यांनी केला होता. या मिष्टान्नचे नाव ‘इम्यूनिटी संदेश’ असे आहे, ज्यामध्ये 15 औषधी वनस्पती आणि मसाले आहेत. यामध्ये हळद, तुळस, केशर आणि वेलची यांचा समावेश आहे.