Armed Force Vacancy: भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये तब्बल 1.55 लाख पदे रिक्त; संरक्षण राज्यमंत्र्यांची माहिती

लवकरच काही हजार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना निघू शकते, असे मानले जात आहे. या अधिसूचनेबाबत सरकार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

Indian Army | Image Used for Representational Purpose only | (Photo Credit-PTI)

भारतीय लष्कराच्या (Indian Armed Forces) तीनही सेवा म्हणजे नौदल, लष्कर आणि हवाई दलात (Army, Navy, Air Force) तब्बल 1.55 लाख पदे रिक्त आहेत. याबाबतची माहिती केंद्र सरकारने सोमवारी राज्यसभेत दिली. एका लेखी उत्तरात संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट म्हणाले की, सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा नियमितपणे आढावा घेतला जातो. ही पदे भरण्यासाठी आणि त्यासाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठी उपक्रमही सुरू करण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले की, मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस (MNS) मध्ये 509 पदे रिक्त आहेत यासह जेसीओ आणि इतर पोस्टची 1,27,673 पदे देखील रिक्त आहेत. मंत्र्यांनी सांगितले की, लष्कराने नियुक्त केलेल्या नागरिकांमध्ये, गट अ मध्ये 52 जागा, गट ब मध्ये 2,549 आणि गट क मध्ये 35,368 रिक्त जागा आहेत.

राज्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, नौदलात 12,428 जागा रिक्त आहेत. नौदलात 1,653 अधिकारी, 29 वैद्यकीय आणि दंत अधिकारी आणि 10,746 खलाशांची कमतरता आहे. यामधील नागरी कर्मचार्‍यांमध्ये, गट अ मध्ये 165, गट ब मध्ये 4207 आणि गट क मध्ये 6,156 रिक्त पदे आहेत.

भारतीय हवाई दलात 7,031 पदे रिक्त आहेत. यामध्ये 721 अधिकारी, 16 वैद्यकीय अधिकारी, 4734 एअरमन आणि वैद्यकीय सहाय्यक ट्रेडची 113 पदे रिक्त आहेत. राज्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, रिक्त पदांचा आढावा घेऊन नियुक्त्या केल्या जातात. अशा स्थितीत ही पदे भरण्यासाठी लवकरच भरती मोहीम राबवली जाणार असल्याचे मानले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरील पदांच्या भरतीसाठी अनेक टप्प्यांत मोहीम राबविण्यात येणार आहे. (हेही वाचा: Army Day in India 2022: 15 जानेवारीला होणार भारतीय सैन्य दिन साजरा, जाणून घ्या याचा इतिहास)

सैन्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी दिलासादायक बाब ठरू शकते. लवकरच काही हजार पदांच्या भरतीसाठी अधिसूचना निघू शकते, असे मानले जात आहे. या अधिसूचनेबाबत सरकार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.