Agnipath Scheme: अग्निपथ योजनेबाबत हरियाणामध्ये हिंसक निदर्शने; राज्यात पुढील 24 तासांसाठी मोबाइल इंटरनेट आणि सर्व एसएमएस सेवा बंद

यासोबतच या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. हरियाणा सरकारने नवीन सैन्य भरती धोरणामुळे होणारे प्रदर्शन पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा आदेश जारी केला आहे.

Internet shutdown (Photo Credits: Unsplash)

हरियाणा सरकारने (Haryana Government) अग्निपथ योजनेवर (Agnipath Scheme) झालेल्या हिंसक निषेधाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोबाइल इंटरनेट सेवा, सर्व एसएमएस सेवा पुढील 24 तासांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने हा आदेश जारी केला असून, पुढील 24 तासांसाठी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा आदेश उद्या, 18 जून दुपारी 4:30 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

हरियाणा सरकारने सर्व दूरसंचार कंपन्यांना या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. यासोबतच या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. हरियाणा सरकारने नवीन सैन्य भरती धोरणामुळे होणारे प्रदर्शन पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा आदेश जारी केला आहे. सध्या राज्यात होत असलेल्या निदर्शनासाठी प्रक्षोभक पोस्ट आणि खोट्या अफवा पसरवण्यासाठी आंदोलक इंटरनेटचा गैरवापर करत आहेत, त्यामुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचे प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

याआधी हरियाणातील पलवलमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात विरोधकांनी निदर्शने केली होती. या निदर्शनात त्यांनी पोलिसांच्या वाहनांना आग लावली आणि या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने फरीदाबाद जिल्ह्यातील बल्लभगढ भागात 24 तासांसाठी मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवा तात्पुरती स्थगित केली होती. मात्र, आता हरियाणा सरकारने त्याची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी केली आहे. दुसरीकडे, खबरदारी म्हणून गुरुग्राममध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. (हेही वाचा: डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला एक महिन्याचा पॅरोल मंजूर)

दरम्यान, अधिका-यांनी माहिती दिली की सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक तरुणांनी रस्त्यांवर चाके जाळली आणि काही तरुण नरवाना येथे रेल्वे रुळांवर बसले आणि त्यांनी जिंद-भटिंडा रेल्वे मार्ग रोखला. रोहतकमध्येही आंदोलक तरुणांनी चाके जाळली, तर बल्लभगडमध्ये राष्ट्रीय महामार्ग-19 वर वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी 40 हून अधिक तरुणांना अटक करण्यात आली.