लवकरच Bhopal मध्ये होऊ शकतो Kunal Kamra आणि Munawar Faruqui यांचा शो; Digvijaya Singh यांनी दिले निमंत्रण

मुनावर त्याच्या एका वादग्रस्त शोमुळे इंदूरमध्ये तुरुंगातही गेला होता. त्यानंतर त्यांच्यावर काही लोकांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता

दिग्विजय सिंह (Photo Credits-ANI)

लवकरच वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि मुनावर फारुकी (Munawar Faruqui) यांचा शो भोपाळमध्ये (Bhopal) होऊ शकतो. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी दोन्ही विनोदवीरांना राजधानीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. परंतु कॉमेडीचा विषय दिग्विजय सिंग असावा, अशी अट त्यांनी दोन्ही कलाकारांसमोर ठेवली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करून कॉमेडियन कुणाल कामरा आणि मुनावर फारुकी यांना त्यांच्याशी संबंधित विषयावर कॉमेडी करण्यासाठी शो आयोजित करण्यासाठी आमंत्रित केले.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मी कुणाल आणि मुनावरसाठी भोपाळमध्ये एक शो आयोजित करतो. सर्व जबाबदारी माझी असेल. अट एकच असेल, फक्त दिग्विजय सिंह हा विनोदाचा विषय असेल. संघ्यांना यावर तरी आक्षेप नसावा. या, घाबरू नका!! तुमच्या सोयीनुसार तारीख आणि वेळ द्या. तुमच्या सर्व अटी मान्य आहेत.’

कुणाल कामरा आणि मुनावर फारुकीचे देशात अनेक शो रद्द करण्यात आले आहेत. दोघांवर प्रक्षोभक कॉमेडी केल्याचा आरोप आहे. नुकताच कुणाल कामराचा बंगळुरूमधील शो रद्द करण्यात आला होता. शो झाला तर स्थळ बंद केले जाईल, अशी धमकी त्याला देण्यात आली होता. त्याचा शो या महिन्यात होणार होता. यापूर्वी कॉमेडियन मुनावर फारुकीलाही बेंगळुरूमध्ये धमकी देण्यात आली होती, त्यानंतर त्याचा शो रद्द करण्यात आला होता. (हेही वाचा: कॉमेडी शोमध्ये हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी; कॉमेडियन मुनावर फारुकी आणि इतर चौघांवर गुन्हा दाखल)

मुनावरचा गेल्या दोन महिन्यांतील हा सलग 12 वा शो होता, जो रद्द झाला. मुनावर त्याच्या एका वादग्रस्त शोमुळे इंदूरमध्ये तुरुंगातही गेला होता. त्यानंतर त्यांच्यावर काही लोकांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच त्याचे सर्व शो आता रद्द होत आहेत. कामरा याची कॉमेडीही अनेकदा सध्याच्या सरकारवर निशाणा साधते. त्याच्यावर गेल्या वर्षी इंडिगो आणि सरकारी मालकीच्या एअर इंडियासह अनेक विमान कंपन्यांनी बंदी घातली होती. यामुळेच आता दिग्विजय सिंह यांनी दोन्ही विनोदवीरांना भोपाळमध्ये शोचे आमंत्रण पाठवले आहे.