'पर्शियामधून आला आहे हिंदू शब्द, अतंत्य घाणेरडा आहे त्याचा अर्थ'; काँग्रेस नेते Satish Jarkiholi यांचे वादग्रस्त विधान
यापूर्वी काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी गीतेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.
काँग्रेस (Congress) नेते आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी हिंदू (Hindu) शब्दाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. हा शब्द भारताचा नाही, हिंदू हा शब्द पर्शियामधून आला आहे असे त्यांनी म्हटले आहे. सतीश जारकीहोळी यांचे वक्तव्य चर्चेचा आणि वादाचा विषय बनले आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला हिंदू शब्दाचा अर्थ कळला तर लाज वाटेल. याचा अर्थ खूप घाणेरडा आहे. आपल्या हिंदीतील भाषणात त्यांनी या गोष्टी सांगितल्या.
रविवारी कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील निप्पाणी भागात एका कार्यक्रमात बोलताना सतीश जारकीहोळी यांनी हिंदू या शब्दाच्या उत्पत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हिंदू हा शब्द भारताचा नाही, असे ते म्हणाले. हा तुमचा हिंदू कसा झाला? यावर चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले. मानव बंधुता संघटनेच्या एका कार्यक्रमात आपल्या भाषणात सतीश जारकीहोळी म्हणाले की हिंदू हा शब्द आमच्यावर जबरदस्तीने लादला जात आहे. हिंदीमध्ये केलेल्या या भाषणात त्यांनी हिंदू शब्दाचा अर्थ अत्यंत घाणेरडा असल्याचे सांगितले.
सतीश जारकीहोळी यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, ते आता इतर राजकीय पक्षांच्या विशेषत: भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. यापूर्वी काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांनी गीतेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. जिहाद केवळ कुराणात नाही, तर गीतेतही जिहाद आहे, येशूमध्येही जिहाद आहे, असे ते म्हणाले होते. (हेही वाचा: मुंबईमधून BJP खासदार Keshari Devi Patel यांना जीवे मारण्याची धमकी; 50 लाखांची खंडणीही मागितली_
पाटील म्हणाले की, इस्लाम धर्मात जिहादची खूप चर्चा झाली आहे. हे केवळ कुराण शरीफमध्ये नाही, तर महाभारतातील गीतेचाही भाग आहे, त्यातही जिहाद आहे. महाभारतात श्रीकृष्णजींनी अर्जुनालाही जिहादचा धडा शिकवला होता. आता जारकीहोळी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला असून, याला व्होट बँकेचा उद्योग असल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, शिवराज पाटील यांच्यानंतर आता कर्नाटक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंना चिथावणी दिली आहे आणि त्यांचा अपमान केला आहे. हा योगायोग नाही, हा व्होटबँकचा उद्योग.