Ujjwala Yojana LPG Subsidy: 9 कोटींहून अधिक महिलांना मोदी सरकारचं गिफ्ट; एलपीजीवर सबसिडी जाहीर

जनतेवरील महागाईचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

LPG-Cylinder (फोटो सौजन्य -Wikimedia Commons)

Ujjwala Yojana LPG Subsidy: मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेच्या 9.6 कोटी लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, 2022 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात 12 सिलिंडर आणि एका सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय किमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी मे महिन्यात पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत 12 सिलिंडरपर्यंत 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. जनतेवरील महागाईचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी मिळत होती आणि आता ती आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा -LPG Cylinder Price: स्वयंपाकाच्या गॅसबाबत मोठा दिलासा; LPG सिलेंडर 500 रुपयांना मिळणार? कोणाला घेता येणार फायदा? जाणून घ्या)

12 रिफिलसाठी 200 रुपये प्रति सिलेंडर -

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी, 24 मार्च रोजी माध्यमांना माहिती दिली की, आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने PMYU च्या लाभार्थ्यांना दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर 200 रुपये अनुदान मंजूर केले आहे. 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेचे 9.59 कोटी लाभार्थी होते.

या घोषणेवर 2022-23 मध्ये 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 मध्ये 7,680 कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहितीही यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी दिली. लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.