Xiaomi घेऊन येत आहे दोन्ही बाजूंनी पाहता येणारा टीव्ही; उद्या लॉन्च होण्याची शक्यता
म्हणजेच हा टीव्ही तुम्ही दोन्ही बाजूने पाहू शकता.
चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमी (Xiaomi) सध्या बाजारात अनेक भल्या भल्या स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देताना दिसून येत आहे. सर्वात तेजीत वाढणारा इलेक्ट्रॉनिक ब्रँड अशी कंपनीची ओळख निर्माण होत आहे. मार्केटमध्ये दबदबा राहावा यासाठी कंपनीने वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्ही यांसारखी इतर उत्पादनेही लॉन्च केली. आता शाओमी याच्याही पुढे जाऊन एक नवीन उत्पादन घेऊन येत आहे. उद्या चीनमध्ये एका इव्हेंटचे आयोजन केले गेले आहे, यामध्ये शाओमी चक्क दोन स्क्रीन असणारा टीव्ही (Double-Sided TV) लॉन्च करण्याची शक्यता आहे. म्हणजेच हा टीव्ही तुम्ही दोन्ही बाजूने पाहू शकता.
शाओमी टीव्ही विभागाचे महाव्यवस्थापक वेबो (Weibo) यांनी, कंपनी या महिन्यात काही नवी उत्पादने बाजारात घेऊन येणार असल्याचे सांगितले होते. तसेच शाओमीच्या टीव्ही विभागाने यापूर्वी एक टिझर पोस्टर लाँच केले होते. यात 23 एप्रिल रोजी 2019 च्या स्मार्ट टीव्ही लाइनअपचे पेइचिंगमध्ये लाँचिंग होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. यामध्ये या दोन स्क्रीन असणाऱ्या टीव्हीची माहिती देण्यात आली होती. (हेही वाचा: Xiaomi ने LED TV किमती केल्या कमी, पाहा ताजे रेट)
गिझचायना (Gizchina)च्या एका अहवालाप्रमाणे, शाओमी या कार्यक्रमात 8 नवीन उत्पादने सादर करू शकते, ज्यात टेबल लँप, स्मार्ट स्केल्स, स्पीकर्स, टीव्ही बॉक्स व्यतिरिक्त इतर अनेक उत्पादने समाविष्ट आहेत. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण असणार आहे हा टीव्ही. सोबतच आधी सदर केल्या गेलेल्या टीव्हीमध्ये काही नवीन अपडेट्स आणून ते टीव्हीही या इव्हेंटमध्ये सदर केले जाऊ शकतात.