राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अर्थात NPR म्हणजे नक्की काय? वाचा सविस्तर
परंतु, या आंदोलनांनी एकीकडे हिंसक रूप घेतलं असताना केंद्र सरकारने मात्र आज राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) ला मंजुरी दिली आहे.
What Is NPR? नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात(CAA protest) देशभरात काही दिवसांपासून आंदोलनं सुरु आहेत. परंतु, या आंदोलनांनी एकीकडे हिंसक रूप घेतलं असताना केंद्र सरकारने मात्र आज राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) ला मंजुरी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत ही NPR ला मंजुरी देण्यात आली असून आता राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी तयार करण्याच्या प्रक्रियेलाही लवकरच सुरुवात होणार आहे. नव्या वर्षात जनगणनेसोबत NPR ही होईल, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. या अंतर्गत देशातील सामान्य रहिवाशांच्या व्यापक ओळखीचा डेटाबेस तयार करण्यात येईल. परंतु NPR म्हणजे नक्की काय हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अर्थात NPR म्हणजे काय?
NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर. मराठीत या संकल्पनेला 'राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही' असे म्हणतात. परंतु, सध्या या संकल्पनेला देशभरात 'राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी' बोलले जात आहे. तर सेन्सस इंडिया या वेबसाईटवर NPR चा अर्थ 'भारतात सामान्यपणे राहणाऱ्या रहिवाशांची नोंदणी' असा दिला आहे. म्हणजेच NPR ही संकल्पना देशातील सर्व सामान्य जनतेसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज असेल. या संकल्पनेअंतर्गत कुठलाही रहिवासी जो स्थानिक क्षेत्रात सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून राहतो आहे, त्याला NPR मध्ये नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे.
त्यामध्ये व्यक्तीचं नाव, घरातल्या प्रमुखाशी त्या व्यक्तीचं नातं, वडिलांचं नाव, आईचं नाव, वैवाहिक स्थिती, जोडीदाराचं नाव (विवाहित असल्यास), लिंग, जन्मतारीख, जन्मस्थळ, राष्ट्रीयत्व, सध्याचा पत्ता, सध्याच्या पत्त्यावर राहत असल्याचा कालावधी, कायमस्वरूपी पत्ता, व्यवसाय, शैक्षणिक पात्रता या सर्व गोष्टी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीदरम्यान विचारल्या जाणार आहेत.
एनपीआरचा एनसीआरशी काहीही संबंध नाही- अमित शाह
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेसाठी कुठलाही पुरावा किंवा कुठलीही कागदपत्रं मागितली जाणार नाहीत. तससह बायोमेट्रिक पद्धतही यात नसेल.