UPI Lite: कमी किंमतीच्या व्यवहारांसाठी RBI ने लाँच केले नवे फिचर; इंटरनेट आणि युपीआय पिनशिवाय करू शकता पैसे ट्रान्सफर
वापरकर्त्याने ऍपमध्ये ऑनलाइन हे पैसे भरल्यानंतर, तो UPI लाइट ऑफलाइन ऍक्सेस करू शकतो आणि व्यवहार केले जाऊ शकतात.
भारतमध्ये दिवसेंदिवस डिजिटल पेमेंट्सची संख्या आणि वापरकर्ते वाढत आहेत. हे व्यवहार सुलभ करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. आता भारत किंवा इतर देशांमधून डिजिटल पेमेंट करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे, कारण भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने डिजिटल पेमेंटला पुढील स्तरावर नेण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2022 मध्ये UPI Lite, UPI वर RuPay क्रेडिट कार्ड आणि भारत बिलपे क्रॉस-बॉर्डर बिल पेमेंट लॉन्च केले आहे. केंद्रीय बँकेने गेल्या आर्थिक धोरणाच्या घोषणेदरम्यान या उपक्रमाची माहिती दिली होती.
काय आहे UPI Lite?
यातील UPI Lite हे सर्वात महत्वाचे आणि उपयोगी फिचर आहे. खास करून कमी किमतीच्या व्यवहारांसाठी RBI ने UPI Lite भारतात लाँच केले आहे. UPI Lite हे UPI प्रमाणे काम करेल. परंतु ते अधिक वेगवान आणि सोपे आहे. महत्त्वाचे म्हणजे, UPI Lite सह, वापरकर्ते इंटरनेट कनेक्शनशिवाय पेमेंट करू शकतात, ज्यामुळे वापरकर्ते डाउनटाइम आणि पीक अवर्समध्येही पैसे लवकर पाठवू शकतात.
UPI Lite द्वारे किती पैसे पाठवू शकता?
मात्र UPI Lite सह, तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त 200 रुपये पाठवू शकता. तसेच, UPI Lite शिल्लकची एकूण मर्यादा फक्त 2,000 रुपये असेल. सध्या कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक हे फिचर देत आहेत.
काय आहे खास?
शक्तीकांत दास यांनी 20 सप्टेंबर रोजी हा इंटरफेस लॉन्च केला होता. यातील अजून एक खास बाब म्हणजे, वापरकर्ते UPI पिन न वापरता UPI Lite वापरून पैसे ट्रान्सफर करू शकतात. सध्या UPI अॅप्स- GooglePay, Phonepe, Paytm वापरताना वापरकर्त्यांना त्यांचा UPI पिन प्रविष्ट करणे आवश्यक आहे. (हेही वाचा: युपीआय वापरकर्त्यांसाठी मोठे अपडेट; GPay, PhonePe व Paytm वर दिवसाला करू शकता फक्त 'इतकेच' व्यवहार, घ्या जाणून)
कसा कराल वापर?
यासाठी ग्राहकांना प्रथम त्यांच्या बँक खात्यातून ऍपमध्ये (इंटरनेट कनेक्टिव्हिटी वापरून) प्रमाणीकरणाद्वारे (Authentication) किंवा UPI ऑटोपेद्वारे पैसे भरावे लागतील. वापरकर्त्याने ऍपमध्ये ऑनलाइन हे पैसे भरल्यानंतर, तो UPI लाइट ऑफलाइन ऍक्सेस करू शकतो आणि व्यवहार केले जाऊ शकतात. त्यानंतर व्यवहारासाठी स्वतंत्र अधिकृतता किंवा UPI पिनची आवश्यकता भासणार नाही. परंतु UPI Lite व्यवहार तुमच्या बँक खाते विवरण किंवा पासबुकमध्ये दाखवले जाणार नाहीत. याशिवाय तुमच्या वॉलेटमध्ये बॅलन्स अपडेटही दाखवली जाणार नाही. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) दररोजच्या व्यवहारांचा सारांश एसएमएसद्वारे पाठवेल. सध्या UPI Lite फिचर BHIM अॅपवर उपलब्ध आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)