SSC Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी खुशखबर; एसएससी करणार 42 हजार पदांची भरती
त्यानंतर ‘अग्निपथ’ प्रकल्पाची घोषणा झाली. आता कर्मचारी निवड आयोगानेही भरती जाहीर केली
सध्या लष्कराच्या 'अग्निपथ' योजनेवरून देशात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. विविध राज्यांमध्ये याचे लोण पोहोचले आहेत. अशात स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) घोषणा केली आहे की 2022 पर्यंत 42,000 पदांची भरती पूर्ण केली जाईल. या व्यतिरिक्त, पुढील काही महिन्यांत 15,247 पदांसाठी नियुक्ती पत्रे देखील जारी केली जातील. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या ट्विटर हँडलवर रविवारी ही घोषणा करण्यात आली. त्यात म्हटले आहे की, ‘डिसेंबर 2022 पूर्वी 42,000 पदांची भरती पूर्ण केली जाईल. याशिवाय एसएससीने आगामी परीक्षेद्वारे 67 हजार 768 रिक्त जागा लवकरात लवकर भरल्या जातील अशी योजना आखली आहे.’
यामध्ये 15,247 पदांसाठी भरतीची पत्रे लवकरच जारी केली जातील, असे कर्मचारी निवड समितीने सांगितले. येत्या काही महिन्यांत केंद्र सरकारच्या विविध विभागांमार्फत नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.मात्र, या घोषणेमुळे लष्कराच्या अल्प-मुदतीची नोकर भरती योजना 'अग्निपथ'मुळे सुरु असलेल्या आंदोलनामध्ये नोकरी शोधणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.
नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या दीड वर्षात 10 लाख सरकारी पदांवर नियुक्ती करण्याची घोषणा केली. त्यानंतर ‘अग्निपथ’ प्रकल्पाची घोषणा झाली. आता कर्मचारी निवड आयोगानेही भरती जाहीर केली. दरम्यान, 2022-23 च्या सामान्य अर्थसंकल्पानुसार, 1 मार्च 2022 पर्यंत केंद्र सरकारच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 36.65 लाख आहे. खर्च विभागाच्या वार्षिक अहवाल (2019-20) नुसार, 1 मार्च 2020 पर्यंत, एकूण 40.78 लाख मंजूर पदांपैकी सुमारे 21.75 टक्के पदे रिक्त आहेत. भारतीय रेल्वे हे सर्वात मोठे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र आहे. (हेही वाचा: Agniveer Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी, पहा PDF)
3 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात, केंद्र सरकारच्या विभागांमध्ये 1 मार्च 2020 पर्यंत 8 लाख 72 हजार 234 पदे रिक्त असल्याची माहिती दिली होती.