Union Budget 2024: 6 वा अर्थसंकल्प सादर करून निर्मला सीतारामन घडवणार इतिहास; अनेक विक्रम करणार आपल्या नावावर

इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या. इंदिरा गांधी यांनी 1970-71 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्या वर्षी, सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय दस्तऐवजांसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक 'ब्रीफकेस' काढून टाकल्या.

Nirmala Sitharaman (Photo Credit - File Image)

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारीला सलग सहावा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर करणार आहेत. यासह त्या देशाच्या दुसऱ्या अर्थमंत्री असतील ज्या सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. हे यश आतापर्यंत फक्त माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा त्या मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांसारख्या माजी अर्थमंत्र्यांचे रेकॉर्ड मागे टाकतील. या नेत्यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर केले होते. अर्थमंत्री म्हणून, देसाई यांनी 1959-1964 दरम्यान पाच वार्षिक आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या आर्थिक वर्ष 2024-25 साठी अंतरिम अर्थसंकल्पावर मतदान केले जाईल. यामुळे एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर नवीन सरकार येईपर्यंत काही वस्तूंवर खर्च करण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे.

सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने सीतारामन त्यांच्या अंतरिम बजेटमध्ये कोणतेही मोठे धोरणात्मक बदल करण्याची शक्यता नाही. अर्थमंत्र्यांनी गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात अंतरिम अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा करण्यास नकार दिला होता. सार्वत्रिक निवडणुकीनंतर जूनच्या आसपास नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नवीन सरकार 2024-25 साठीचा संपूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर करतील. (हेही वाचा-Union Budget 2024: केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केली जाणारी 'Halwa Ceremony' काय असते?)

साधारणपणे, अंतरिम अर्थसंकल्पात मोठ्या धोरणात्मक घोषणा नसतात, परंतु अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक अशी पावले उचलण्यास सरकारवर कोणताही प्रतिबंध नाही. दरम्यान, 2017 मध्ये सरकारने फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसाऐवजी एक तारखेला अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे 28 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याची वसाहतकालीन परंपरा संपुष्टात आली. जेटलींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पीयूष गोयल यांनी 1 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.

तथापी, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मोदी सरकारने वित्त विभागाची जबाबदारी सीतारमण यांच्याकडे सोपवली. इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या. इंदिरा गांधी यांनी 1970-71 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्या वर्षी, सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय दस्तऐवजांसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक 'ब्रीफकेस' काढून टाकल्या.

मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला -

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम अर्थसंकल्पासह त्यांनी सलग सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प प्रथम अर्थमंत्री आर के षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. यावेळी निर्मला सीतारामन या सहावा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात त्या ग्रामीण क्षेत्राला चालना देण्यासाठी काही उपाययोजना करू शकतात.