मतदान ओळखपत्र हरवलंय? घाबरु नका; कायदेशीर मार्गाने बनवा डुप्लिकेट

तुमचेही गहाळ झाले असेल तर, काळजी नको. ते कायदेशीर मार्गाने पुन्हा डुप्लिकेट कसे बनवायचे घ्या जाणून...

मुंबई: संसदीय लोकशाहीतला सर्वोच्च उत्सव म्हणजे निवडणूक. ज्याद्वारे देशभरातील नागरिक संविधानाने दिलेला आपला मतदानाचा अधिकार वापरतात. या अधिकाराच्या बहूमतानेच प्रतिनिधी आणि पर्यायाने सरकार निवडले जाते. पण, अनेकदा अनेक लोक या अधिकारापासून वंचित राहतात. कारण, त्यांच्याकडे मतदान ओळखपत्रच नसते. केवळ मतदानाचा अधिकारच कशाला अनेक शासकीय, प्रशासकीय कामे, नोकरी, महाविद्यालयीन परीक्षेचे फॉर्म भरताना अशा एक ना अनेक ठिकाणी मतदान ओळखपत्राची गरज भासते. त्यामुळे हे ओळखपत्र गहाळ झाले तर, काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांचे मतदान ओळखपत्र गहाळ झालेही असेल. तुमचेही गहाळ झाले असेल तर, काळजी नको. ते कायदेशीर मार्गाने पुन्हा डुप्लिकेट कसे बनवायचे घ्या जाणून...

मतदान ओळखपत्र डुप्लिकेट बनवण्याचा मार्ग

मतदान ओळखपत्र गहाळ झाल्याचे किंवा हरवल्याचे ध्यानात येताच पहिले काम करा. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा. पोलीस दप्तरी नोंद झालेल्या तक्रार अर्जाची प्रत जपून ठेवा. भविष्यात कामी येऊ शकते.

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला (वेबसाईट) भेट द्या. त्यावर उपलब्द असलेला फॉर्म ००२ भरा. या फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. त्यानंतर दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करून पोलिसांत नोंद झालेल्या तक्रार अर्जाची प्रतही जोडा. तुम्ही ऑनलाईन सेवा वापरू इच्छित नसाल तर, तुम्हाला हा फॉर्म निवडणूक आयोगाच्या कार्यालयातही उपलब्द होईल.

हेही ध्यानात ठेवा की, इतर कागदपत्रांमध्ये तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना यांच्या झेरॉक्स प्रति आणि तुमचा निवासाचा पत्ताही द्यावा लागेल. हेही ध्यानात ठेवा की, ऑनलाईन फॉर्म भरल्यास तुमचे मतदान ओळखपत्र लवकर तयार होऊ शकते.

तुमची सर्व कागदपत्रे बीएलओ कार्यालयात जमा करा. त्यानंतर आपल्याला आपला अर्ज स्वीकारल्याची प्रत अधिकाऱ्यांकडून मिळेल. त्यानंतर तुमचे ओळखपत्र लवकर तुम्हाला उपलब्द होईल.