Dhirubhai Ambani 88th Birth Anniversary: धीरूभाई अंबानी यांच्या जन्मदिनी जाणून घ्या त्यांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी
आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी!
धीरजलाल हिराचंद अंबानी म्हणजेच धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांची आज जयंती आहे. 88 वर्षांपूर्वी जन्मलेले धीरूभाई अंबानी हे कायमच भारतातील मोठे उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांनी रिलायंस इंडस्ट्रीजची स्थापना केली आहे. एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांचा उद्योग जगतामधील प्रवास अनेक उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी!
धीरूभाई अंबानी यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी
- धीरूभाई अंबानी यांचा जन्म गुजरात मधील सौराष्ट्र मध्ये झाला आहे. वडील हिराचंद गोवर्धनदास अंबानी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई यांना 4 भावंडं आहेत.
- 1949 साली धीरूभाई अंबानी यांनी 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई येमेनमध्ये एडन येथे नोकरीला गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणार्या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई महिन्याला 300 रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरीला लागले.
- 1958 साली धीरूभाई अंबानी येमेन सोडून कायमचे भारतामध्ये परतले. अवघ्या 50 हजारांच्या रूपयांचं भांडवल उभं करत त्यांनी चुलत भांवडासोबत टेक्सटाईल कंपनी सुरू केली.
- 1977 साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये केले. लहान गुंतवणूकदारांकडून भाग भांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई अंबानी हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले.
- धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा 'रिलायंस' ही एक भारतीय कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात पैसे कमवण्यात यशस्वी झाली होती. तिचा फोर्ब्सच्या टॉप 500 मध्ये समावेश होता.
- धीरूभाई अंबानी यांच्या पहिल्याच प्रयत्नासाठी 58 हजार लोकांनी आपले पैसे गुंतविले. नंतर 1978 साली धीरूभाई अंबानी कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरूवात केली.
- 1999-2000 मध्ये रिलायन्सने 25 हजार कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली. पुढे 2000 साली मध्ये 25,000 कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला.
- 2002 साली त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली. त्यानंतर त्यांना पॅरॅलिसिसचा अटॅक आला. त्यानंतर कोमात गेलेल्या अंबानीचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. अनेकांना ठाऊक नाही हा त्यांचा दुसरा अटॅक होता. 1986 साली त्यांनी पहिला अटॅक आला होता त्यावेळी उजवा हात निकामी झाला होता.
- 2002 साली धीरूभाई अंबानींचा पोस्टल स्टॅम्प आला. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी 'पद्म विभुषण' या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर आजही घराघरात त्यांचं नाव घेतलं जातं. अजुनही औद्योगिक बाजारात रिलायंसला कुणीही टक्कर देऊ शकलेले नाही.