1 October New Rules: देशभरात 1 ऑक्टोबरपासून लागू होत आहेत मोठे नियम; सर्वसामान्यांवर होणार थेट परिणाम, जाणून घ्या सविस्तर

तुम्हाला या नियमांची माहिती असायला हवी. असे अनेक नियम आहेत जे दर महिन्याला बदलतात. तसेच बँकिंग इत्यादींशी संबंधित अनेक कंपन्या महिन्याच्या मध्यात काही बदल करतात.

Indian Money | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

1 October New Rules: सप्टेंबर महिना नुकताच संपला आहे आणि त्यानंतर सुरु झालेल्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक आर्थिक बदल होतात. अशा परिस्थितीत 1 ऑक्टोबर 2024 पासून अनेक नियम बदलत (New Rules) आहेत. यामध्ये एलपीजीच्या किमती, अल्पबचत योजना, शेअर बाजार आणि क्रेडिट कार्डच्या नियमांमधील बदलांचा समावेश आहे. यातील काही बदल फायद्याचे आहेत तर, काहींचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. तुम्हाला या नियमांची माहिती असायला हवी. असे अनेक नियम आहेत जे दर महिन्याला बदलतात. तसेच बँकिंग इत्यादींशी संबंधित अनेक कंपन्या महिन्याच्या मध्यात काही बदल करतात.

एलपीजीमध्ये बदल-

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला 1 ऑक्टोबर 2024 च्या पहाटे सिलेंडरच्या किमतीत बदल दिसू शकतो. सुधारित किमती सकाळी 6 वाजता जारी केल्या जातात. मात्र, अलीकडच्या काळात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये अनेक बदल दिसून आले असले तरी, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये बराच काळ बदल झालेला नाही.

एटीएफ आणि सीएनजी-पीएनजीमध्ये बदल-

महिन्याच्या पहिल्या दिवशी, तेल कंपन्या एअर टर्बाइन इंधन (ATF) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमती देखील सुधारतात. कंपन्या किंमती वाढवू किंवा कमी करू शकतात. एटीएफ दर वाढल्यास हवाई प्रवास महाग होऊ शकतो. त्याच वेळी, सीएनजी महाग झाल्यास, बस किंवा ऑटोमधून प्रवास करणे महाग होऊ शकते. पीएनजी महाग झाल्याने पाईपद्वारे घरात येणारा गॅस महाग होणार आहे.

एचडीएफसी क्रेडिट कार्ड-

तुम्ही एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला याचा फटका बसेल. एचडीएफसी बँकेने त्यांच्या काही क्रेडिट कार्ड्सच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये बदल केले आहेत. एचडीएफसी बँकेने SmartBuy प्लॅटफॉर्मवरील Apple उत्पादनांसाठी रिवॉर्ड पॉइंट्सची पूर्तता प्रति कॅलेंडर तिमाही एका उत्पादनापर्यंत मर्यादित केली आहे. हे नवे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

किमान वेतन वाढवले ​​जाईल-

कामगारांना आता 1 ऑक्टोबरपासून वाढीव वेतन मिळणार आहे. केंद्र सरकारने यामध्ये बदल केले आहेत.

बांधकाम, साफसफाई, रिफायनिंग, लोडिंग आणि अनलोडिंग यांसारख्या अकुशल काम क्षेत्रातील कामगारांसाठी सेक्टर 'ए' मधील किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन (20,358 रुपये प्रति महिना), अर्ध-कुशल लोकांसाठी ते 868 रुपये प्रतिदिन (रु. 22,568 प्रति महिना) असेल. याशिवाय कुशल कर्मचारी, लिपिक आणि निशस्त्र वॉचमन किंवा सेन्टीनलसाठी प्रतिदिन 954 रुपये (रु. 24,804 रुपये) आणि अत्यंत कुशल आणि सशस्त्र वॉचमन किंवा सेन्टिनेलसाठी, प्रतिदिन 1,035 रुपये (रु. 26,910 प्रति महिना) दिले जातील. (हेही वाचा: Latest Post Office Schemes Interest Rates: केंद्र सरकारने जाहीर केले PPF, SCSS, SSY, इतर लहान बचत योजनांचे व्याजदर; पुढील 3 महिन्यांत एवढी होईल कमाई)

सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये बदल-

आज, 1 ऑक्टोबरपासून सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत केवळ कायदेशीर पालकच मुलींचे खाते चालवू शकतील. पूर्वी असे नव्हते. जर मुलीचे खाते एखाद्या व्यक्तीने उघडले असेल जो तिचा कायदेशीर पालक ठरणार नाही. त्याला 1 ऑक्टोबरपासून हे खाते मुलीच्या पालकांना किंवा कायदेशीर पालकाकडे हस्तांतरित करावे लागेल. तसे न केल्यास खाते बंद केले जाईल.

आधार नोंदणी आयडी-

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आयडी नमूद करण्याची परवानगी देणारी तरतूद रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. आता पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी किंवा आयकर रिटर्न भरण्यासाठी आधार नोंदणी आयडी वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. हा नवा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. पॅनचा गैरवापर आणि डुप्लिकेशन रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

पीएफखाते-

आज, 1 ऑक्टोबरपासून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफबाबत बदल होणार आहेत. पीपीएफमध्ये पहिला बदल हा अल्पवयीन मुलांसाठी उघडलेल्या पीपीएफ खात्याशी संबंधित आहे. अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या पीपीएफ खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दराने तो 18 वर्षांचा होईपर्यंत व्याज मिळेल. त्यानंतर, पीपीएफसाठी लागू होणारा व्याजदर लागू होईल. त्याच्या 18 व्या वाढदिवसापासून मॅच्युरिटीची गणना केली जाईल.

दुसरा बदल असा आहे की जर एखाद्याने एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडले असेल, तर प्राथमिक खात्यावर सध्याचा व्याजदर लागू होईल आणि दुय्यम खाते प्राथमिक खात्यात विलीन केले जाईल. जास्तीची रक्कम 0% व्याजासह परत केली जाईल. दोन पेक्षा जास्त अतिरिक्त खाती उघडल्याच्या तारखेपासून 0% व्याज मिळतील.