Cobrapost Report: देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; DHFL कडून तब्बल 31 हजार कोटी फस्त

हा घोटाळा देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा मानण्यात येत आहे. कोब्रापोस्ट या संकेतस्थळाकडून या बाबतचे वृत्त प्रसारित झाले आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

विजय माल्या, निरव मोदी यांनी देशाचे आर्थिक नुकसान करून पलायन केले. आता परत एकदा एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. गृह वित्त क्षेत्रातील प्रमुख कंपनी दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून (DHFL) हजारो कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हा घोटाळा देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा मानण्यात येत आहे. कोब्रापोस्ट (Cobrapost) या संकेतस्थळाकडून या बाबतचे वृत्त प्रसारित झाले आहे. डीएचएफएलकडून तब्बल 31 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे सांगितले जात आहे.

डीएचएफएलने बोगस कंपनींना कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. मात्र, तो पैसा प्रवर्तकांच्या रूपाने पुन्हा त्याच कंपनीकडे आला. अशा प्रकारे डीएचएफएलने कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा दावा कोब्रा पोस्टने केला आहे. या पैशांपैकी एक मोठी रक्कम भारतीय जनता पक्षाला देणगी म्हणून देण्यात आली आहे. ही देणगी सरकारकडून संरक्षण मिळवण्यासाठी देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे बँकिंग क्षेत्रासह राजकीय क्षेत्रही हादरून गेले आहे. कपिल वाधवान, अरूणा वाधवान आणि धीरज वाधवान हे डीएचएफएलचे प्रवर्तक आहेत. या पैशातून त्यांनी दुबई, इंग्लंड, मॉरिशिअस आणि श्रीलंकेत मालमत्ता खरेदी केल्याचे समजते. (हेही वाचा : पेट्रोल – डिझेलचा महाघोटाळा : पाईपलाईन फोडून चोरले लाखो रुपयांचे इंधन)

कुठल्याही कंपनीला कर्ज देताना त्यांची मागील कामगिरी तसेच कंपनीची मालमत्ता इतकेच काय संचालकांची वैयक्तिक मालमत्ता लक्षात घेतली जाते. कर्ज वाटप करतानाच त्या कंपनीची कर्ज फेडण्याची क्षमता देखील तपासून पहिली जाते. मात्र दिवान हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीला भरमसाठ कर्ज देताना सरकारी बँकांनी हा नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आले आहे. डीएचएफएलने गुजरात व कर्नाटकमध्ये 1 लाख गुंतवून अनेक छोट्या कंपन्या उघडल्या आणि मिळालेली कर्जे आपल्याकडे वळवून घेतली. यापैकी अनेक कंपन्यांची कार्यालये एकाच पत्त्यावर होती. इतकेच नव्हे तर बहुतांश कंपन्यांचे संचालक मंडळही सारखेच होते.

जवळपास 32 भारतीय आणि विदेशी बँकांनी डीएचएफएल समूहाला सुमारे 97,000 कोटी रुपये कर्जरूपात दिले आहेत. यातीलच जवळपास 31,500 कोटी रुपये प्रवर्तकांनी फस्त केले. स्टेट बँकेने 'डीएचएफएल'ला सर्वाधिक 11,500 कोटींचे कर्ज दिले आहे. तर बँक ऑफ बडोदाने 'डीएचएफएल'ला पाच हजार कोटींचे कर्ज दिले आहे.