Uttar Pradesh: स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमचं दिली जाणार एका महिलेला फाशी; जाणून घ्या सविस्तर वृत्त
मथुरामध्ये महिलांना फाशी देण्यासाठी 150 वर्षापूर्वी फाशीघर बांधण्यात आले होते. परंतु तेथे अद्याप कोणालाही फाशी देण्यात आलेली नाही.
Uttar Pradesh: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला तिच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी फाशी देण्यात येणार आहे. यासाठी मथुरा कारागृहातही तयारी सुरू झाली आहे. अमरोहा येथे राहणारी शबनम यांना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. 2008 सालची ही घटना आहे जेव्हा एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे राहणाऱ्या शबनम नावाच्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्याच कुटुंबातील सात सदस्यांची कुऱ्हाडीच्या साहाय्याने निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालय तसेच सुप्रीम कोर्टाने महिलेची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
यानंतर शबनम यांनी राष्ट्रपतींकडे दया मागितली होती. परंतु, राष्ट्रपतींनी शबनमची दया याचिका फेटाळली. त्यामुळे शबनम स्वतंत्र भारताच्या इतिहासात फाशी देणारी पहिली महिला असणार आहे. शबनमला फाशी देण्यासाठी जल्हाद पवन यांनी दोनदा फासीघराची पाहणी केली आहे. (वाचा - MP Bus Accident: मध्य प्रदेशात कालव्यात बस पडून अपघाताप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मृतांना 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर)
शबनम यांना फाशी देण्यासाठी बिहारमधील बक्सरमधून दोरी मागवण्यात आली आहे. मथुरामध्ये महिलांना फाशी देण्यासाठी 150 वर्षापूर्वी फाशीघर बांधण्यात आले होते. परंतु तेथे अद्याप कोणालाही फाशी देण्यात आलेली नाही. शबनमला फाशी देण्याबाबत मथुरा जेलचे अधीक्षक शैलेंद्रकुमार मैत्रेय म्हणाले की, शबनमच्या फाशीची तारीख निश्चित झालेली नाही. तसेच याबाबत कोणताही आदेश आलेला नाही. परंतु, जेल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मृत्यूचे वॉरंट निघताचं शबनमला फाशी देण्यात येईल.