लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून 1551 कोटी रुपयांचा माल ताब्यात; महाराष्ट्रातून सर्वाधिक अवैध दारू जप्त

यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक 19 लाख लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

देशातील सर्वात मोठी निवडणूक, लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. आचारसंहिता लागू झालेली आहे, तिचे पालनही होताना दिसत आहे. अशावेळी मतदारांना आमिष दाखवण्याचेही प्रकार घडतात. यासाठी पैसे, दारू, विविध वस्तू यांचा उपयोग केला जातो. असले अनुचित प्रकार घडू नयेत यावरही निवडणूक आयोगाचे लक्ष आहे. म्हणूनच गेल्या 25 दिवसांमध्ये निवडणूक आयोगाने तब्बल 1551 कोटी रुपयांचा माल ताब्यात घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक 19 लाख लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडून जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये 162.892 कोटी रुपयांची दारू, 708.594 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, 318.495 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू आणि 29 .342 कोटी रुपयांच्या इतर वस्तू यांचा समावेश होतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकांत अशा प्रकारच्या 299.94 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली होती. गेल्या निवडणुकांवेळी तामिळनाडू राज्यातून सर्वात जास्त रोकड जप्त करण्यात आली होती. (हेही वाचा: नमो टीव्ही वादाच्या भोवऱ्यात, दूरदर्शनलाही निवडणूक आयोगाचे पत्र; निवडणुकीच्या तोंडावर चॅनलला परवानगी मिळालीच कशी?)

यावेळी महाराष्ट्रातून सर्वाधील अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर उत्तरप्रदेशचा नंबर लागतो. तर अंमली पदार्थांमध्ये गुजरात अग्रेसर आहे. गुजरातमध्ये 100 किलो अंमली पदार्थ पकडले असून त्यांची किंमत तब्बल 500 कोटी इतकी आहे. गुजरातमध्येच सर्वाधिक संपत्ती म्हणजेच 510 कोटी रुपयांची संपत्ती पकडण्यात आली आहे. तर पंजाबमधून 116 कोटींचे अंमली पदार्थ निवडणूक आयोगाने जप्त केले आहेत.