Coronavirus Impact: CBSE पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठवणार; सरकारने दिले आदेश
अशात मानव संसाधन विकास मंत्रालयाने (Ministry of Human Resource Development) एक महत्वाचा निर्णय घेत
देशभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे लॉक डाऊन (Lockdown) आहे, यामुळे शाळा-कॉलेजेस बंद आहेत. अशात मानव संसाधन विकास मंत्रालयाने (Ministry of Human Resource Development) एक महत्वाचा निर्णय घेत सीबीएसई (CBSE) बोर्डाला एक आदेश दिला आहे. मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार पहिली ते आठवीच्या मुलांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठवण्यास सांगितले आहे. मंत्रालयाने पुढे असेही म्हटले आहे की, 9 वी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही त्यांचे प्रकल्प, चाचण्या आणि टर्म परीक्षेच्या आधारे पुढील वर्गात पाठवले जावे. 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत, जेव्हा सीबीएसई बोर्ड परीक्षा घेण्याच्या स्थितीत असेल तेव्हा त्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शिक्षण सचिव अमित खरे आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणतात, कोरोना व्हायरसच्या दृष्टीकोनातून सीबीएसईला पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवण्यास सांगितले आहे.' बर्याच राज्य मंडळांनी अशा घोषणा आधीच केल्या आहेत, परंतु सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती.
(हेही वाचा: मुंबई: Coronavirus च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालयाच्या इयत्ता सहावी ते आठवीच्या परीक्षा रद्द)
देशात बऱ्याच ठिकाणी 9 आणि 11 वीच्या परीक्षा झाल्या आहेत मात्र काही ठिकाणी अजूनही त्या झाल्या नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या वार्षिक कामगिरीद्वारे पुढील वर्गात पाठवण्यास सांगितले आहे. 19 ते 31 मार्च या कालावधीत होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा तहकूब करण्यात आल्या आहेत. या परीक्षा पुन्हा कधी होणार या संदर्भात सद्य परिस्थितीत निर्णय घेणे अवघड आहे. म्हणूनच, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उर्वरित परीक्षा आयोजित करण्यासाठी एक नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल. मात्र, बोर्ड निश्चितपणे परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना 10 दिवसांचा अवधी देईल. म्हणजेच नोटीस/वेळापत्रक जारी झाल्यानंतर 10 दिवसानंतर परीक्षा सुरू होईल.