School Holiday Tomorrow 4th September: शाळांना उद्या जन्माष्टमी दिवशी नव्हे तर 5 सप्टेंबरला दहीहंडीची सुट्टी
महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीनुसार जन्माष्टमी-गोपाळकाळाची सुट्टी ५ सप्टेंबर रोजी असणार आहे.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीचा दिवस हा श्रीकृष्ण जन्मोत्सव अर्थात जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदा 4 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि 5 सप्टेंबरला गोपाळकाला अर्थात दही हंडी साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि अत्यंत उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानले जाणारे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला होता. भक्ती आणि श्रद्धेचा हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण शाळांना कृष्ण जन्माष्टमीची सुट्टी नाही. मात्र महाराष्ट्रात परंपरेनुसार जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला किंवा दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी शालेय सुट्टी असणार आहे.
राज्य शिक्षण विभागाच्या यादीनुसार, 5 सप्टेंबरच्या जन्माष्टमी-गोपाळकाला सुट्टीनंतर 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची सुट्टी असणार आहे. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात सणासुदीच्या काळात विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने सुट्टी मिळणार आहे. नक्की वाचा: Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करतात? जाणून घ्या यंदा पूजा विधी मुहूर्त.
जन्माष्टमीची नव्हे गोपाळकाल्याची शाळांना सुट्टी
दरवर्षी जन्माष्टमी आणि शालेय सुट्टीच्या तारखांमध्ये होणाऱ्या या फरकामुळे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून आपापल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुट्टीच्या नेमक्या तारखेबाबत आधीच स्पष्ट सूचना देण्याचे आवाहन केले जात आहे. उद्या शाळा सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांनी नियमित वेळापत्रकानुसार शाळेत उपस्थित राहणे अपेक्षित आहे.