ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाचा दणका; विश्वासू आणि जवळच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
नुकतीच निवडणूक आयोगाने 1000 कोटी पेक्षा जास्त रकमेचा माल पकडला, प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला, दूरदर्शनला नोटीस पाठवली. या सर्व कारवाया घडल्या त्या आचारसंहितेचा भंग झाला म्हणून. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे विश्वासू आणि जवळचे समजल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी तडकाफडकी बदल्या केल्या. या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
सीबीआयविरोधात धरणे आंदोलनाला बसलेल्या ममतांसोबत कोलकात्याचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा दिसले होते, त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्यासह इतर तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते मुकुल रॉय यांनी कोलकाता आणि बिधानगरच्या पोलीस आयुक्तांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. राज्यात सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग होऊ शकतो असे भाजप पक्षाचे म्हणणे होते. कोणत्याही प्रकारचे दुष्कृत्य होऊ नये याबाबत निवडणूक आयोग दक्ष आहे, त्यामुळेच ही कारवाई झाली आहे. (हेही वाचा: ममता बनर्जींचं धरणं आंदोलन सुरु; राहुल गांधी, राज ठाकरे यांच्या सह अनेक विरोधकांचा पाठिंबा)
दरम्यान ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यांना निवडणूकीच्या कामात समावून घेतले जाऊ नये, असे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मलय डे यांच्या नावे काढलेल्या आदेशात निवडणूक आयोगाने हा बदल्यांचा आदेश तत्काळ स्वरुपात लागू करण्यात आल्याचे म्हटले आहे.