COVID19: रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधितांना स्मार्टफोन, टॅबलेट वापरण्याची परवानगी द्यावी; केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अमेरिका, ब्राझील यांसारख्या देशानंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) यादीत आता भारताचाही समावेश झाला आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकजण ताणतणावात जगत आहेत. एवढेच नव्हेतर, काहीजणांनी कोरोनाच्या भितीने आत्महत्यासारखा चुकीचा पर्याय निवडला आहे. अशा रुग्णांना मानसिकदृष्ट्या मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने (Central Government) सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्वपूर्ण पत्र लिहले आहे. ज्यात रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधितांना स्मार्टफोन किंवा टॅबलेट वापरण्याची परवानगी देण्यात यावी, ज्यामुळे ते आपल्या कुटुंबियांशी, मित्रांशी आणि नातेवाईकांशी संपर्क साधू शकतात.
कोरोनाची वाढती लोकसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. आतसेच रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण मानसिक आजारांना बळी पडू लागले आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयातील आरोग्य सेवा महासंचालक डॉ. राजीव गर्ग यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की, 'सामाजिक संबंध रूग्णांना शांत ठेवू शकतात आणि उपचार संघाने दिलेली मानसिक मदतही मजबूत करू शकते. कृपया रूग्ण क्षेत्रात स्मार्टफोन आणि टॅब्लेट उपकरणांना परवानगी देण्यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना द्या जेणेकरुन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी बोलू शकतील. दरम्यान, वॉर्डात मोबाइल फोनच्या वापरास परवानगी आहे, जेणेकरून रुग्ण आपल्या कुटूंबाच्या संपर्कात राहू शकतील. परंतु, काही राज्यांतील रूग्णाच्या नातेवाईकांकडून आम्हाला तक्रारी आल्या आहेत की रुग्णालय प्रशासनाला मोबाइल फोन ठेवण्यास परवानगी न दिल्याने ते रूग्णाशी संपर्क साधू शकत नाहीत. हे देखील वाचा- Karnataka CM BS Yediyurappa Tests Positive For Coronavirus: कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांना कोरोना विषाणूची लागण; प्रकृती स्थिर, रुग्णालयात केले दाखल
भारतात आतापर्यंत 17 लाख 50 हजार 724 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 37 हजार 364 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 लाख 45 हजार 630 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच संपूर्ण देशात आता एकूण 5 लाख 67 हजार 730 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.