भारताचा प्रवास 'मेक इन इंडियाकडून रेप इन इंडिया'कडे; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचं वादग्रस्त वक्तव्य

भारताची वाटचाल 'मेक इन इंडिया'कडून 'रेप इन इंडिया'च्या दिशेने होते आहे,' असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

Congress leader Adhir Ranjan Chaudhary (PC-ANI)

सध्या देशात महिलांवर सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर टीकेची झोड उठवली आहे. भारताची वाटचाल 'मेक इन इंडिया'कडून (Make in India) 'रेप इन इंडिया'च्या दिशेने होते आहे,' असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी (Congress leader Adhir Ranjan Chaudhary) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

चौधरी आज लोकसभेत देशातील बलात्काराच्या घटना व महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, 'कोणत्याही मुद्द्यावर मत मांडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांवरील अमानुष अत्याचारांविषयी एक शब्दही बोलत नाहीत. ही बाब अतिशय दुर्दैवी आहे. भारताचा प्रवास 'मेक इन इंडियाकडून रेप इन इंडिया'च्या दिशेने चालला आहे. देशात कठुआपासून ते उन्नावपर्यंत रोज एक सामूहिक बलात्कार आणि पीडित मुलीला जाळून टाकल्याची घटना घडते. दिवसाला 106 बलात्काराच्या घटना घडतात. यातील 10 पैकी 4 तरुणी अल्पवयीन असतात. परंतु, यातील केवळ एका घटनेतील गुन्हेगाराला शिक्षा मिळते. ही बाब अतिशय वाईट आणि लाजिरवाणी आहे.' असंही चौधरी यावेळी म्हणाले. (हेही वाचा - Delhi Nirbhaya Gang Rape Case: चारही आरोपींना फासावर लटकवले जाणार?)

याआधीही अधीर चौधरी हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी चौधरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 'निर्बला' म्हणून हिणवले होते. त्यानंतर त्यांना सीतारामन यांची माफी मागावी लागली होती. त्यामुळे आता या वक्तव्यामुळे चौधरी पुन्हा त्यांना माफी मागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.