Career Camps: खुशखबर! राज्यातील 36 जिल्ह्यांत 6 मे ते 6 जून 2023 दरम्यान करिअर शिबिरांचे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार विविध अभ्यासक्रमांची व नवीन संधींची माहिती
इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे (Career Camps) आयोजन करण्यात आले आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक विविध संधींसंदर्भात समुपदेशन केले जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे व बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजित ठिकाणी शिबिरांचे उद्घाटन जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या करिअर शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक-युवती व पालकांना विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. करियर शिबिराच्या ठिकाणी विविध स्टॉलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांची तसेच इतर माहिती देण्यात येणार आहे. (हेही वाचा: आता इयत्ता सहावीपासून शिकवले जाणार AI आणि Coding; लवकरच सीबीएसई अभ्यासक्रमात होणार समाविष्ट)
इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक ) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी या शिबिरांमधून सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. परदेशातील उच्च शिक्षणासंबंधीही मार्गदर्शन देण्यात येणार आहे.