Calcutta HC on Ram Navami Violence: 'जिथे 8 तास शांततेत सण साजरा करू शकत नाही, तिथे मतदानाची गरज नाही', रामनवमी हिंसाचारावर कोलकाता उच्च न्यायालयाची टिप्पणी

याशिवाय सध्याची परिस्थिती पाहता बहरामपूर मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्याची सूचनाही न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली आहे.

Calcutta High Court (PC - ANI)

Calcutta HC on Ram Navami Violence: रामनवमी (Ram Navami 2024) च्या दिवशी मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराबाबत कलकत्ता उच्च न्यायालयात (Calcutta High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 8 तास शांततेत सण साजरा करू शकत नाही, तिथे मतदानाची गरज नाही, अशी टिप्पणी कलकत्ता न्यायालयाने केली आहे. याशिवाय सध्याची परिस्थिती पाहता बहरामपूर मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्याची सूचनाही न्यायालयाने निवडणूक आयोगाला केली आहे. या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भातील पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी होणार आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरमपूर येथे रामनवमीच्या मिरवणुकीत दंगल उसळली होती.

मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान उसळलेल्या दंगलीबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी टिप्पणी करताना सांगितले की, 'बहारमपूरमध्ये 13 मे रोजी होणाऱ्या निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी निवडणूक आयोगाला सूचना देण्यात येतील.' रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टीएस शिवगननम यांनी ही टिप्पणी केली आहे. जिथे आठ तास लोक आपला सण शांततेत साजरा करू शकत नाहीत, तिथे यावेळी मतदानाची गरज नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. (हेही वाचा -Youth Holding Gun Viral Video: रामनवमी रॅलीमध्ये तरुणाच्या हातात बंदुक; पोलिसांकडून एकास अटक, पाहा व्हिडिओ)

दरम्यान, मुर्शिदाबादच्या रेजीनगर भागात रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार झाला होता. वृत्तानुसार, मिरवणूक रेजीनगरच्या शांतीपूर भागातून जात असताना काही लोकांनी घराच्या छतावरून विटा आणि बॉम्ब फेकले. या घटनेत अनेक जण जखमी झाले. रामनवमीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. (Malad 'Ram Navami' Shobha Yatra हिंसाचार प्रकरणातील 21 अटकेत असलेल्यांना 6 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी)

रामनवमीच्या मिरवणुकीसंदर्भात बहरमपूरमध्ये झालेल्या दंगलीबाबत कलकत्ता उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. एनआयएला या घटनेचा तपास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी फिर्यादी पक्षाने केली. मंगळवारी सरन्यायाधीशांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या सुनावणीत याचिकाकर्त्याच्या वकिलाने सरन्यायाधीशांसमोर रामनवमीच्या दंगलीबाबत चिंता व्यक्त केली. केवळ बहरामपूरच नाही तर रामनवमीच्या दिवशी राज्यात घडलेल्या अशांततेच्या सर्व घटनांची माहिती फिर्यादीकडून न्यायालयाला देण्यात आली.

दरम्यान, मंगळवारच्या खटल्यातील अशांततेवर सरन्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली. यानंतर त्यांनी आपल्या निरीक्षणात बहरामपूरची निवडणूक पुढे ढकलल्याचा मुद्दा उपस्थित केला. या घटनेला कोणी भडकावले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असं सरन्यायाधीश यांनी म्हटलं आहे. राज्य आणि केंद्र एजन्सी इच्छित असल्यास प्रतिज्ञापत्र दाखल करू शकतात. न्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. रामनवमीला काय घडले याचा अहवाल राज्याने न्यायालयाला द्यावा, असंही सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी होणार आहे.