भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी संशयित पत्र; पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अजित डोभाल यांचे फोटो चिन्हांकीत

या पत्राबरोबर त्यांना पावडरही मिळाली आहे. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या फोटोंवर क्रॉसचे चिन्ह आहे. या सर्व प्रकारानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील एक पथक (फॉरेन्सिक) प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Bhopal MP, Pragya Singh Thakur (PC- ANI)

भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर (Bhopal BJP MP, Pragya Singh Thakur) यांना उर्दू भाषेत लिहिले संशयित पत्र (Suspicious Letter) मिळाले आहे. या पत्राबरोबर त्यांना पावडरही मिळाली आहे. या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या फोटोंवर क्रॉसचे चिन्ह आहे. या सर्व प्रकारानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील एक पथक (फॉरेन्सिक) प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संशयित पत्र मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातचं पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित पत्राची आणि त्यासोबत देण्यात आलेल्या पावडरची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी बोलावले. सध्या हे संशयित पत्र फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा - भाजपा खासदार सनी देओल हरवले; गुरदासपूर मतदारसंघातील पठाणकोट शहरात लागले पोस्टर)

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले की, मला याअगोदरही अशा स्वरुपाची पत्र आली होती. याबाबत मी पोलिसांत तक्रार केली होती. परंतु, आता पोलिसांनी याची दखल घेतली नाही. आज आलेले पत्र हे दहशतवाद्यांचे कृत्य असल्याची शक्यता आहे. मात्र, मी अशा घटनांना घाबरणार नाही, असंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितलं.