Odisha Train Tragedy: बालासोर रेल्वे अपघाताच्या FIR मध्ये गुन्हेगारी निष्काळजीपणाचा आरोप; CBI आजपासून करणार तपास
दरम्यान, सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीआरएस) अपघाताची चौकशी सुरू केली आहे.
Odisha Train Tragedy: ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात (Train Accident) जिरापीने गुन्हेगारी निष्काळजीपणाचा दाखला देत एफआयआर दाखल केला आहे. आयपीसी आणि रेल्वे कायद्याच्या कलमांतर्गत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये कोणाचेही नाव नाही. दरम्यान, सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीआरएस) अपघाताची चौकशी सुरू केली आहे. तर सीबीआय मंगळवारपासून या प्रकरणाचा तपास सुरू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील सीबीआय मुख्यालयातील स्पेशल क्राइम युनिटकडून हा तपास केला जाण्याची शक्यता आहे.
सीबीआय अपघाताच्या तपासावर विरोधकांच्या आक्षेपावर, सरकारमधील सूत्रांनी सांगितले की प्राथमिक तपासात "जाणूनबुजून" सिस्टम छेडछाड झाल्याचे स्पष्टपणे सूचित केले आहे. यासाठी केंद्रीय यंत्रणेकडून सखोल तपास करण्याची गरज आहे. सरकारशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत केलेल्या तपासात अशी अनेक महत्त्वाची तथ्ये समोर आली आहेत ज्यामुळे व्यावसायिक एजन्सीद्वारे तपास करण्याची गरज आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमशी जाणीवपूर्वक छेडछाड केल्याशिवाय, मुख्य मार्गासाठी नियत असलेल्या ट्रेनला लूप लाइनकडे वळवणे शक्य नाही. बहनगा येथे कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला धडकल्याने 275 लोकांचा मृत्यू झाला तर 1175 जण जखमी झाले. (हेही वाचा - Another Train Derails In Odisha: पुन्हा एकदा रेल्वे दुर्घटना, ओडिशातील बारगड जिल्ह्यात मालगाडी रुळावरुन घसरली (Watch Video))
यासोबतच रेल्वे कायद्यातील कलम 153 (रेल्वे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारे बेकायदेशीर आणि निष्काळजी कृत्य), 154 आणि 175 (जीवाला धोका निर्माण करणे) यांचाही एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. या अपघातात रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग अद्याप कळू शकलेला नसून तपासानंतरच सत्य बाहेर येईल, असे नमूद केले आहे. बालेश्वर जीआरपी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पप्पू नायक यांनी हा एफआयआर दाखल केला आहे. यानंतर डीएसपी रणजित नायक यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे.