प्रेयसीला अडवण्यासाठी त्याने पसरवली चक्क विमान अपहरणाची अफवा; झाली जन्मठेप आणि 5 कोटीची शिक्षा
न्यायालयाने याबाबत कठोर पावले उचलत या व्यक्तिला जन्मठेप आणि 5 कोटी रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. बिरजू सल्ला (Birju Kishor Salla) असे या व्यक्तीचे नाव असून तो मुंबईचा रहिवास आहे.
मुंबई: लोक प्रेमात आंधळे होऊन कोणत्या थराला जाऊ शकतात याचे एक उदाहरण नुकतेच घडले आहे. आपल्या पूर्व प्रेयसीला परत मिळवण्यासाठी आणि विमान कंपनीला बदनाम करून बंद पाडण्यासाठी एका उद्योगपतीने चक्क विमान अपहरणाचा (Aircraft Hijacking) बनाव केला. न्यायालयाने याबाबत कठोर पावले उचलत या व्यक्तिला जन्मठेप आणि 5 कोटी रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. बिरजू सल्ला (Birju Kishor Salla) असे या व्यक्तीचे नाव असून तो मुंबईचा रहिवास आहे.
2017 साली जेट एअरवेजच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या शौचालयात इंग्रजी आणि उर्दूमध्ये विमानात अपहरणकर्ते असल्याचे लिहिले होते. या चिठ्ठीमुळे विमानात एकचा खळबळ माजली होती. त्यानंतर विमानाचे अहमदाबाद येथे आपत्कालीन परिस्थितीत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यानंतर चौकशी सुरु केली असता हे सर्व त्याच विमानात बिझनेस क्लासमध्ये असलेल्या सल्ला याने केले असल्याचे उघड झाले. (हेही वाचा: प्रेमाच्या जाळ्यात ओढत 'मुंबई'तील उद्योगपतीचे 'दिल्ली'त अपहरण; महिलांची टोळी गजाआड)
आता देशातील नवीन आणि कठोर विमान अपहरण कायदा अंतर्गत पहिली शिक्षा म्हणून, गुजरातच्या अहमदाबाद राष्ट्रीय तपासणी संस्था (NIA) च्या विशेष न्यायालयाने सल्ला याला जन्मठेप आणि 5 कोटी दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्या विमानाच्या वैमानिकाला 1 लाख रुपये, सर्व एअर होस्टेसना प्रत्येकी 50 हजार रुपये आणि सर्व प्रवाशांना प्रत्येकी 25 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.