पुन्हा हादरले उत्तर प्रदेश; उन्नाव आणि हैदराबादनंतर फतेहपूरमध्ये युवतीवर बलात्कार करून जिवंत जाळले; पुतणीवर अत्याचार करून आरोपी काका फरार

येथे कलियुगी काकाने आपल्या पुतणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळले आहे. याबाबत गुन्हा दाखल केल्यावर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये (Fatehpur) 'उन्नाव केस' आणि ‘हैदराबाद’ सारखे प्रकरण समोर आले आहे. येथे कलियुगी काकाने आपल्या पुतणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळले आहे. याबाबत गुन्हा दाखल केल्यावर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना हुसैनगंज पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या काकाने तिच्यावर बलात्कार केला, मात्र बलात्काराचा निषेध केल्यावर त्याने पीडित मुलीला रॉकेल ओतून जिवंत जाळले. गंभीरपणे भाजलेल्या पीडितेस प्रथम जवळच्या सीएचसीमध्ये नेण्यात आले. मुलीची नाजूक प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला कानपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी मुलगी घरी एकटी होती, तिच्या कुटुंबातील सदस्य शेतात कामावर गेले. हीच संधी साधून काकाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीने आपण ही गोष्ट कुटुंबियांना सांगणार असल्याचे सांगितले. हे एकून काकाने तिला खोलीत ओढत नेले आणि तिथे रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यानंतर मुलीने बचावासाठी आरडओरडा केला. शेजाऱ्यांनी कशीबशी ही आग विझवली व ताबडतोब तिच्या कुटुंबाला याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा: धक्कादायक! महिला तहसीलदार विजया रेड्डी यांना कार्यालयात घुसून जिवंत जाळले)

पुढे तिला कानपूरला पाठवले. फतेहपूर जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमधील डॉ नरेश विशाल यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता 90 टक्के भाजली आहे. फक्त पायाचा काही भागच वाचला आहे बाकी सर्व शरीर जळाले आहे. याबाबत पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे.