तब्बल 51 महिलांचा शबरीमाला मंदिरात प्रवेश; केरळ सरकारने दिली सुप्रीम कोर्टाला माहिती

केरळ सरकारने, एक नाही दोन नाही तर तब्बल 51 महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश केला असल्याचे सांगितले आहे

शबरीमाला मंदिर (Photo Credits: IANS)

नुकतेच दोन महिलांनी शबरीमाला मंदिरात (Sabarimala Temple) प्रवेश केल्यानंतर संपूर्ण भारतात गदारोळ माजला. सामान्य नागरिकांपासून ते राजकारणी लोकांपर्यंत अनेकांनी यावर टीका केली. इतकेच नव्हे तर यातील एका महिलेचा कुटुंबियांकडून शारीरिक छळही करण्यात आला. हे प्रकरण अजून ताजे असताना केरळ सरकारने, एक नाही दोन नाही तर तब्बल 51 महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश केला असल्याचे सांगितले आहे. सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयांने महिलांवर असलेली मंदिर प्रवेशाची बंदी उठवली. त्यानंतर अनेक महिलांनी या मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना अडवण्यात आले. मात्र आजमितीस एकूण 51 महिलांनी आयप्पा स्वामींचे दर्शन घेतले असल्याची माहिती केरळ सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला दिली आहे.

कनकदुर्गा (Kanak Durga) आणि बिंदू (Bindu) अशा दोन महिलांनी 2 जानेवारीला आयप्पा स्वामींच्या मंदिरात प्रवेश केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयामध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र या गोष्टीला अनेकांनी कडाडून विरोध केला. याआधीच सुप्रीम कोर्टाने, ज्या महिलेची शबरीमाला मंदिरात जाण्याची इच्छा आहे त्या प्रत्येक महिलेला पोलिसांनी संरक्षण देऊन अय्यपा स्वामींचे दर्शन घडवावे असे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आजपर्यंत 50 वर्षाच्या आतील 51 महिलांनी शबरीमाला मंदिरात जाऊन अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतले असल्याची बाब समोर आली आहे.  (हेही वाचा : शबरीमाला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांना सुरक्षा प्रदान करा- सर्वोच्च न्यायालय)

कनकदुर्गा आणि बिंदू अशा दोघींनीही आपल्याला संरक्षण मिळावे अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे, याबाबतची सुनावणी आज पार पडली. या दरम्यान 10 ते 50 वयोगटातील 7564 महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून ऑनलाइन नोंदणी केली आहे, पैकी 51 महिलांनी अय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतले आहे अशी माहिती केरळ राज्याच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला दिली.