Family Planning Surgery: धक्कादायक! हैद्राबादमध्ये शिबिरात केलेल्या नसबंदीनंतर 4 महिलांचा मृत्यू
येथे नसबंदीच्या शस्त्रक्रियेतून निर्माण झालेल्या विविध समस्यांमुळे 4 महिलांचा मृत्यू झाला.
Family Planning Surgery: हैदराबादमध्ये नसबंदीनंतर महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नसबंदीनंतर आजारी पडून किमान 4 महिलांचा मृत्यू झाला. आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की 25 ऑगस्ट रोजी हैदराबादच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील इब्राहिमपट्टणम येथील सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) येथे सामूहिक नसबंदी शिबिर आयोजित करण्यात आले होते. येथे नसबंदीच्या शस्त्रक्रियेतून निर्माण झालेल्या विविध समस्यांमुळे 4 महिलांचा मृत्यू झाला.
इब्राहिमपट्टणम सीएचसीमध्ये एकूण 34 महिलांची नसबंदी करण्यात आली. उर्वरित महिलांची प्रकृती स्थिर असल्याचे सार्वजनिक आरोग्य संचालक जी श्रीनिवास राव यांनी पत्रकारांना सांगितले. यातील सात जणांना चांगल्या उपचारासाठी हैदराबादला हलवण्यात आले आहे. चार मृतांपैकी ममता यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला, तर सुषमा यांचा सोमवारी मृत्यू झाला. उर्वरित दोन महिलांचा मृत्यू मंगळवारी पहाटे झाला, असं राव यांनी सांगितलं. (हेही वाचा - MP Shocker: जामिनावर बाहेर आलेल्या नराधमाने पुन्हा केला अल्पवयीन पीडितेवर बलात्कार, जीवे मारण्याची दिली होती धमकी)
राव यांनी सांगितलं की, इब्राहिमपट्टणम सीएचसीच्या वैद्यकीय अधीक्षकांना आजीवन निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर लॅप्रोस्कोपिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (नसबंदी) करणाऱ्या डॉक्टरांनाही निलंबित करण्यात आले आहे. तेलंगणा सरकारने कथित अयशस्वी शस्त्रक्रियांची सखोल चौकशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय तज्ञ समिती स्थापन केली आहे. दोषी सिद्ध झाल्यास डॉक्टरांचे परवाने रद्द केले जाणार आहेत.
दरम्यान, राव यांनी पुढे बोलताना सांगितले की, अयशस्वी शस्त्रक्रियांच्या अशा घटना फार दुर्मिळ आहेत. महिलांमध्ये ही समस्या कशामुळे उद्भवली ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याची नेमकी कारणे आम्ही शोधू. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच दुहेरी बेडरूमचे घर आणि त्यांच्या हयात असलेल्या मुलांना निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे.