अभिनेत्री वनिता खरातची सायबर फसवणूक, बनावट कुरिअर कॉलमुळे WhatsApp हॅक
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री वनिता खरात हिला बनावट कुरिअर कंपनी प्रतिनिधीच्या फोनद्वारे सायबर फसवणुकीचा सामना करावा लागला. यामुळे तिचे व्हॉट्सअॅप हॅक होऊन तिच्या मित्रमैत्रिणींकडून तिच्याच नावाने पैसे उकळण्यात आले.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) हिला अलीकडेच एका सायबर फसवणुकीचा सामना करावा लागला. एका मोठ्या कुरिअर कंपनीचे नाव घेत आलेल्या फसव्या फोनकॉलनंतर तिचा व्हॉट्सअॅप क्रमांक हॅक करण्यात आला. यानंतर हॅकरने तिच्या ओळखीच्या व्यक्तींकडे तिच्याच नावाने आर्थिक मदत मागत अनेकांची फसवणूक केली. वनिताने स्वतः इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत ही घटना उघड केली असून, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
नेमकं काय घडलं
वनिताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओ नुसार, तिच्याकडे एक पार्सल येणे अपेक्षित असतानाच तिला एक फोनकॉल आला. समोरील व्यक्तीने स्वतःची ओळख ब्लू डार्ट कुरिअर कंपनीचा प्रतिनिधी अशी करून दिली आणि डिलिव्हरी बॉयला तिचा पत्ता सापडत नसल्याचे सांगत, एका ठराविक क्रमांकावर पत्ता पाठवण्याची विनंती केली. सुरुवातीला तिने याबाबत शंका व्यक्त केली, कारण संबंधित संकेतस्थळावर तिचा पत्ता आधीच नोंदवलेला होता. मात्र दोन-तीन वेळा फोन आल्यानंतर तिने संबंधित क्रमांक डायल केला, आणि काही क्षणांतच तिचे व्हॉट्सअॅप तिच्या फोनमधून आपोआप लॉगआऊट होऊन हॅक झाले.
मित्रमैत्रिणींची आर्थिक फसवणूक
व्हॉट्सअॅप हॅक झाल्यानंतर हॅकरने तिच्याकडे येणारे कॉल स्वतःच्या क्रमांकावर वळवले, त्यामुळे तिला फोन येणे बंद झाले. दरम्यान, हॅकरने तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व व्यक्तींना तिच्याच नावाने संदेश पाठवला, ज्यामध्ये आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत ठराविक रक्कम पाठवण्याची विनंती करण्यात आली होती. या संदेशावर विश्वास ठेवत तिच्या अनेक मित्रमैत्रिणींनी प्रतिसाद दिला आणि काहींनी प्रत्यक्षात पैसेही पाठवले. या प्रकारामुळे तिच्या ओळखीच्या अनेकांची आर्थिक फसवणूक झाली.
वनिताचे नागरिकांना आवाहन
संपूर्ण प्रकाराची माहिती सोशल मीडियावर शेअर करताना वनिताने आपल्या फॉलोअर्सना सतर्क राहण्याचे आवाहन केले. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉल किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये, तसेच कोणत्याही अनोळखी क्रमांकावर संपर्क साधण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी, असे तिने सांगितले. याशिवाय, ओळखीच्या व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर अचानक आर्थिक मदतीची मागणी आल्यास पैसे पाठवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष फोनवर बोलून खात्री करावी, असा सल्लाही तिने दिला. संशयास्पद कॉल आल्यास तो क्रमांक तत्काळ ब्लॉक करावा किंवा सायबर सेलकडे तक्रार नोंदवावी, असेही तिने नमूद केले.
कुरिअर कंपनीच्या नावाने होणाऱ्या अशा फसवणुकीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या असून, बड्या कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करत सामान्य नागरिकांची तसेच सेलिब्रिटींचीही फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकरणांमध्ये फसवणूक करणारे बनावट लिंक किंवा क्रमांकाच्या माध्यमातून पीडितांच्या मोबाईलमधील डेटा व सोशल मीडिया खाती ताब्यात घेतात आणि त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींकडून आर्थिक फसवणूक करतात. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा फसवणुकीपासून बचावासाठी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंकवर क्लिक न करणे आणि कोणत्याही आर्थिक व्यवहारापूर्वी खातरजमा करणे आवश्यक आहे.