Navratri Special: अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीचे नवदुर्गांच्या रूपातील हे खास फोटोशूट
महाराष्ट्रातल्या देवींच्या स्थानांविषयी आपल्याला माहिती आहेच.
स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत माता अनसुयेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने (Kashmira Kulkarni) नवरात्र उत्सवात देवीची नऊ रुपं धारण केली आहेत. कश्मिरा खऱ्या आयुष्यातही खूप धार्मिक आहे. नवरात्रीच्या या उत्सवात तिने सेटवरही घटस्थापना केली. नऊ दिवस अविरत तेवत असणारा दिवा, कडक उपवास, अनवाणी रहाणं, देवी स्त्रोत्र वाचन या गोष्टी ती कटाक्षाने पाळते. या नऊ दिवसात शूटिंगच्या वेळा सांभाळत ती या धार्मिक गोष्टी निष्ठेने करते. नवरात्री निमित्ताने कश्मिराने केलेलं हे फोटोशूट भक्तीभावाने केल्याचं ती सांगते. महाराष्ट्रातल्या देवींच्या स्थानांविषयी आपल्याला माहिती आहेच. पण फोटोशूट करताना संपूर्ण भारतातल्या देवींचं महात्म्य कळावं हा उद्देश होता. नऊ दिवस, नऊ देवी, नऊ देवींचं महात्म्य आणि नऊ रंग याचा विचार करुन हे फोटोशूट केल्याचं कश्मिराने सांगितलं.
कश्मिराने धारण केलेल्या नऊ देवींच्या रुपांमधील पहिलं रुप आहे शाकंभरी देवीचं. देवी भागवतामध्ये अकराव्या अध्यायात असा उल्लेख आहे की, शत वर्षे दुष्काळाने जन पीडित झाले असताना देवीने शाक म्हणजेच भाजी पुरवून सर्वांची क्षुधा शांत केली. म्हणूनच या देवतेला शाकंभरी देवी म्हण्टलं जातं. देवीच्या या रुपाला गंगम्मा देवी असंही म्हटले जाते. दरवर्षी शाकंभरी देवीच्या उत्सवाला सर्व भाज्यांनी सजावट केली जाते...
दुसरं रुप आहे ब्रह्मचारिणी दुर्गेचं. नवशक्तींपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेचं दुसरं रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचं मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणार्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे.
तिसरं रुप आहे माता वैष्णव देवीचं.
|| ॐ सहस्त्र शीर्षाः पुरुषः सहस्त्राक्षः सहस्त्र-पातस-भूमिग्वं सव्वेत-स्तपुत्वा यतिष्ठ दर्शागुलाम्।
आगच्छ वैष्णो देवी स्थाने-चात्र स्थिरो भव।। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं देवीचं हे रुप.
चतुर्थ रुप आहे मरियम्मा देवीचं. मरियम्मा ही तमिळ प्रांतातील देवी आहे, ज्याची उपासना पूर्व-वेदिक भारतात सुरु झाली. मरी या शब्दाचा अर्थ आहे "पाऊस" आणि अम्माचा अर्थ "आई" आहे. तामिळनाडूच्या ग्रामीण भागात मरियम्मा देवी आई म्हणून ओळखली जाते.
पाचवे रुप आहे यलम्मा देवी. यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात यलम्मा देवीचे उपासक आढळतात. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आहे, आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तिथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते.
सहावं रुप आहे कोल्हापूरात वसलेल्या आई जगदंबेचं. प्राचीन करवीर नगरीतील अंबाबाईचा उल्लेख पुराणातही सापडतो. पुराणानुसार आदिशक्तीची एकशे आठ ठिकाणे आहेत. त्यांच्यापैकीच करवीर क्षेत्रास विशेष महत्व आहे. सहा शक्तीपीठांपैकी हे एक असून येथे इच्छापूर्तीसोबतच मनःशांतीही मिळते. त्यामुळेच उत्तर काशीपेक्षाही ह्या ठिकाणास महत्व आहे, असा भाविकांचा विश्वास आहे.
सातवं रुप आहे कालीमातेचं. दुष्टांच्या अंतासाठी देवीने हे रुप धारणं केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो.
आठवं रुप आहे महागौरी. दुर्गापुजेला आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते.
नववं रुप आहे महालक्ष्मी. देवीची ही नऊ रुपं कधी आई, कधी बहिण, कधी सखी तर कधी पत्नी अश्या विविध रुपात आपल्या सभोवताली वावरत असतात. त्यांचा सन्मान हीच खरी देवीची उपासना आहे.