सीआयडी शो होणार बंद ; 'या' दिवशी प्रदर्शित होणार अखेरचा भाग
एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत यांच्या दमदार अभिनयाने आणि जबरदस्त डायलॉग्सने नटलेला शो सीआयडी लवकरच बंद होणार आहे.
एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत यांच्या दमदार अभिनयाने आणि जबरदस्त डायलॉग्सने नटलेला शो सीआयडी लवकरच बंद होणार आहे. रोज नवनव्या कथा घेऊन हा शो गेली 20 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. या शो मधील 'कुछ तो गडबड है दया,' 'दया, दरवाजा तोड दो' हे डायलॉग अतिशय लोकप्रिय झाले. इतकंच नाही तर या शो ची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही झाली आहे.
शो मधील सर्वच पात्रांनी आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आणि 20 वर्षांची यशस्वी कारकीर्द पार केली. आता मात्र हा सर्वात जास्त चाललेला आणि लोकप्रियतेचे उच्चांक गाठलेला सीआयडी शो बंद होणार आहे. 27 ऑक्टोबरला या शो चा अखेरचा भाग सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.
सीआयडी हा शो सोनी टीव्हीवर 1998 मध्ये सुरु झाला आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाला. पण आता मात्र प्रेक्षकांचा हिरमोड होणार आहे. गेल्या 20 वर्षात या शो चे तब्बल 1550 एपिसोड पूर्ण झाले आहेत. आता मात्र शोचे निर्माते बी.पी. सिंग यांनी शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चॅनलनेही या शो कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत होते. कदाचित यामुळेच निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असावा. मात्र यामागचे निश्चित कारण अद्यापही करु शकलेले नाही. त्याचबरोबर हा शो फक्त 3 महिन्यांसाठी ऑफएअर जात असल्याचेही बोलले जात आहे.
मे 2016 मध्ये महिनाभर या शो चे प्रसारण बंद करण्यात आले होते. तर याचवर्षी जुलै ते सप्टेंबर या दोन महिन्यांसाठी शो ऑफ एअर गेला होता.