IPL Auction 2025 Live

Tumbbad च्या प्रीक्वल किंवा सिक्वल बाबत विचार सुरु; पाहा काय म्हणाला चित्रपटाचा निर्माता

आता निर्माता सोहम शाहने या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच तुंबाडचा सिक्वल किंवा प्रीक्वल काढणार असल्याचं सांगितलं आहे.

Tumbbad as Franchise | (Instagram &Twitter)

2018 च्या ऑक्टोबर मध्ये आलेल्या तुंबाडने (Tumbbad) सिनेमाकडे पाहण्याची भारतीय चित्रपटसृष्टीची दृष्टीच बदलून टाकली. उत्तम दर्जाची कथा, अभिनयाची उत्कृष्ट जाण असलेले अभिनेते यांना जर चांगल्या प्रतीच्या व्हिजुअल इफेक्ट्सची जोड लाभली तर आपल्याकडेसुद्धा हॉलीवूडइतक्या किंवा किंबहुना जास्त प्रभावी कलाकृती बनू शकतात, हे तुंबाडने अधोरेखित केले. तर दुसरीकडे प्रेक्षकांना आवडतं म्हणून सुमार दर्जाचे सिनेमे माथी मारणाऱ्या निर्मात्यांना प्रेक्षकांनी सुद्धा हे पटवून दिलं की चांगल्या कलाकृतीला प्रेक्षक नेहमी उचलून धरतातच. तुंबाडची कमाई ही एखाद्या तद्दन मसालापटासारखी बक्कळ नसली तरीही अपेक्षेपेक्षा जास्त होती. अपेक्षेपेक्षा याच साठी की 'कमाई' या एकमेव मुद्द्यावर चित्रपटाची कथा बरेच वर्ष रखडली होती. राही बर्वे अखेर ही कथा घेऊन सोहम शाहला (Sohum Shah) भेटला आणि त्याने हा सिनेमा बनवण्याचं मनावर घेतलं. इतकंच नव्हे तर कथेतील मूळ पात्र सुद्धा त्यानेच साकारलं. हा सिनेमा बनवण्यासाठी तब्बल सहा वर्ष लागली.

तुंबाड पाहून आल्यानंतर सुद्धा त्याच जगात रेंगाळणाऱ्या प्रेक्षकांना हस्तरचं पुढे काय, किंवा पांडुरंग नंतर काय करत असेल असे अनेक प्रश्न भेडसावले. आता निर्माता सोहम शाहने या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच तुंबाडचा सिक्वल किंवा प्रीक्वल काढणार असल्याचं सांगितलं आहे. त्याबाबत बोलताना सोहम शाह म्हणतो, ''पण हा सिनेमा नक्कीच लवकर पूर्ण करण्याचा इरादा आहे. आम्ही सध्या लेखकाच्या शोधात आहोत. या भागात सुद्धा तुंबाडची काही पात्रं आणि हस्तर असणार आहेत.'' (हेही वाचा. अंगावर शहारे आणणारा 'तुंबाड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडीओ))

तुंबाडचं कौतुक राजकुमार हिरानी, शाहरुख खान सारख्या मोठ्या कलाकारांनी सुद्धा केलं होतं. आता तुंबाडच्या मूळ कथेला लाभलेलं प्रेम या कलाकृतीला सुद्धा मिळतंय का हे पाहणं औत्सुक्याचं आहे.