Pandu: ‘पांडू चित्रपटातील कलाकारांवर गुन्हे दाखल करा’, 'रिपाई'ने केली मागणी; पोलिसांकडे निवेदन सादर
एकीकडे सामान्य नागरिकांनी मास्क न वापरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, या कलावंतांवर अशी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही.
राज्यात कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याचे दिसून आल्यावर, सरकारने निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यानुसार राज्यातील चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरवात केली. नुकताच ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘पांडू’ (Pandu) या मराठी सिनेमाचा पहिला शो पार पडला. मात्र आता हा चित्रपट एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. शोसाठी आलेल्या सेलिब्रिटींनी कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
‘पांडू’ या चित्रपटामध्ये भाऊ कदम आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या शोचा आनंदोत्सव साजरा करताना कलाकारांचा भर गर्दीत विनामस्क डान्स करतानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या चित्रपटातील कलाकारांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरपीआय एकतावादीचे युवाध्यक्ष भैय्यासाहेब इंदिसे यांनी चित्रपटातील कलाकार व आयोजकांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी इंदिसे यांनी केली आहे.
इंदिसे यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, ’ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्ये शुक्रवारी पांडू या सिनेमाचा पहिला शो झाला. या वेळी भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, उदय सबनिस, सविता मालपेकर, प्राजक्ता माळी, कुशल बद्रीके, विजू माने यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकाही सेलिब्रेटींने मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले नाही. विशेष म्हणजे, मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन लस घेणे सक्तीचे असताना एकाच्याही लसीकरणाच्या प्रमाणपत्राची पाहणी करण्यात आली नाही.’ (हेही वाचा: Jhimma Box Office Collection: 'झिम्मा' मराठी चित्रपटात मोठ्या यशाची भर, कमावले 'इतके' कोटी रुपये)
ते पुढे म्हणतात. ‘या कलावंतांनी दोन्ही लस घेतल्या असतीलही, पण, त्यांनी कोरोनासाठी लागू केलेल्या नियमांचे पालन केलेले नाही. एकीकडे सामान्य नागरिकांनी मास्क न वापरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, या कलावंतांवर अशी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. अनेकदा कलावंतांचे अनुकरण सामान्य लोक करीत असतात. त्यामुळे येथेही असे अनुकरण झाले तर तिसरी लाट अटळ आहे. त्यामुळे पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या तत्त्वाने संबधित कलाकारांवर पँडामिक अॅक्टनुसार गुन्हे दाखल करावेत.’