Marathi Films: आता दर्जेदार मराठी चित्रपटांसाठी तज्ञ सुचविणार उपाययोजना; समिती गठीत, प्रवीण तरडे, प्रिया बेर्डे, निशिगंधा वाड, मेघा धाडे यांचा समावेश

चित्रपट आणि करमणूक माध्यमाची व्याप्ती मोठी असल्यामुळे सर्वसमावेशक धोरण तयार करणे आवश्यक असल्याने या समितीमार्फत आश्वासक धोरण तयार करण्यात येणार आहे.

Theater | Representational image (Photo Credits: pxhere)

चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या पद्धतींच्या अनुषंगाने “चित्रपट धोरण समिती” गठीत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील चित्रपटसृष्टीला नवी दिशा मिळणार आहे. चित्रपट निर्मिती केंद्रांना प्रोत्साहन देणे आणि तांत्रिक व कौशल्य विकासाच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध करण्याबाबत समितीमार्फत धोरण आखण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ निर्माती श्रीमती स्मिता ठाकरे असून निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या समावेशाने ही समिती सक्षम करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात चित्रीकरण, प्रसारण, आस्वादन आणि तंत्रज्ञान प्रक्रियेच्या पद्धतीमध्ये कालानुरुप बदल झाले आहेत. चित्रपट आणि करमणूक माध्यमाची व्याप्ती मोठी असल्यामुळे सर्वसमावेशक धोरण तयार करणे आवश्यक असल्याने या समितीमार्फत आश्वासक धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी समितीची बैठक वेळोवेळी घेण्यात येईल आणि तज्ञांच्या सल्ल्याने चित्रपट क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येतील. समितीचा अहवाल लवकरच शासनाकडे सादर केला जाईल. (हेही वाचा: Movie on Ratan Tata: रतन टाटा यांच्या जीवनावर बनणार चित्रपट, 190 हून अधिक देशांमध्ये होणार प्रदर्शित)

या समितीत यांचा समावेश आहे-

१. श्रीमती स्मिता ठाकरे अध्यक्ष (ज्येष्ठ निर्माती)

२. श्री. प्रवीण तरडे सदस्य (निर्माता, दिग्दर्शक व कलाकार)

३. श्री. मंगेश देसाई सदस्य (निर्माता व कलाकार)

४. श्री. दिगंबर नाईक सदस्य (कलाकार)

५. श्री. नितेश नांदगावकर सदस्य (कला दिग्दर्शक)

६. श्री. प्रभाकर मोरे सदस्य (कलाकार)

७. श्रीमती सविता मालपेकर सदस्य (कलाकार)

८. श्रीमती गार्गी फुले सदस्य (कलाकार)

९. श्रीमती आसावरी जोशी सदस्य (कलाकार)

१०. श्री. श्रीपाद जोशी सदस्य

११. श्रीमती प्रिया बेर्डे सदस्य (कलाकार)

१२. श्रीमती निशिगंधा वाड सदस्य (कलाकार)

१३. श्रीमती मेघा धाडे सदस्य (कलाकार)

१४. श्री. नितिन वैद्य सदस्य (निर्माता, दिग्दर्शक, चित्रपट आस्वादक)

१५. श्रीमती प्रिया कृष्णस्वामी सदस्य (लेखिका, दिग्दर्शका)

१६. श्री. विशाल भारव्दाज सदस्य (लेखक, निर्माता, दिग्दर्शक व संगीतकार)

१७. श्री. रमेश तौरानी सदस्य (टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड)

१८. श्री. उज्वल निरगुडकर सदस्य (ऑस्कर अकॅडमी सदस्य)

१९. श्री. अशोक राणे सदस्य (आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक)

२०. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय – सदस्य

२१. मुख्य कार्यकारी अधिकारी, (सांस्कृतिक समन्वय आणि विशेष प्रकल्प, दादासाहेब फाळके चित्रनगरी) – सदस्य

२२. सह व्यवस्थापकीय संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरी – सदस्य सचिव

समितीची मुख्य उद्दिष्टे-

१) कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत छायाचित्रण, संकलन, ध्वनी, प्रॉडक्शन डिझाईन, रंगभूषा, वेशभूषा, डबिंग, डीआय, व्हीएफएक्स, अॅनिमेशन आदी विभागातील शॉर्ट टर्म कोर्स, फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया यासारख्या संस्थेच्या मदतीने सुरु करण्याबाबत सूचना करणे.

२) चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सर्जनशील अर्थव्यवस्थेचा (Creative Economy) प्रकार आहे. या दृष्टीकोनातून विविध कार्यशाळांचे आयोजनाबाबत सूचना करणे.

३) अनेक शहरात असलेली नाट्यगृहे आठवड्यातून एकाच प्रयोगासाठी वापरली जातात. तिथे सिंगल थिएटरच्या धर्तीवर थिएटर उपलब्ध करुन देणे. सिने-नाट्यगृह उभारण्याबाबत सल्ला देणे.

४) आंतरराष्ट्रीय सह निर्माती (international co-production) हा चित्रपट निर्मिती अधिक सुलभ करण्याचा आणि जागतिक पातळीवर ओळख निर्माण करुन देण्याविषयी जागृतीपर मार्गदर्शन करणे.

५) विविध चित्रपट महोत्सवातून मराठी चित्रपटसृष्टीला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, याविषयी मार्गदर्शन करणे.

६) महाराष्ट्र व चित्रनगरी, मुंबई हे भारतातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती केंद्र (Destination) बनविण्याबाबत सल्ला देणे.

७) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना राज्यात प्रोत्साहित करण्याबाबत सल्ला देणे / उपाययोजना सुचविणे.

८) राज्यात चित्रपट प्रेरित पर्यटनास (Film Induced Tourism) चालना देण्यासाठी पर्याय सुचविणे.

९) चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील युवकांना रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करण्याबाबत उपाय सुचविणे.

१०) चित्रपट जगतातील नवनवीन तांत्रिक घडमोडी OTT Platform, Web Series and films, Animation, VFX इ. अंतर्गत उपाययोजना सुचविणे.

११) दृकश्राव्य माध्यमाशी निगडीत ऐनवेळीच्या उपस्थित विषयांबाबत उपाययोजना सुचविणे.

१२) नागरी / ग्रामीण स्थळांच्या बाह्य चित्रिकरणासाठी सुलभपणे परवानगी प्राप्त होतील याबाबत उपाय योजना सुचविणे.

१३) चित्रिकरणानंतर प्रदर्शनास सहाय्यभूत ठरणाऱ्या अनुषंगीक बाबी यांचा धोरणात समावेश करणे, अशा असतील. यानुसार समिती कार्य करेल.