Uber Driver Threatens Manava Naik: मराठी अभिनेत्री मनवा नाईकला उबर चालकाने धमकावले; म्हणाला, 'थांब तुला दाखवतोच आता'

या पोस्टमध्ये तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये मनवाने तिच्याबरोबर नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगितलं आहे.

Marathi actress Manava Naik (PC - Instagram)

Uber Driver Threatens Manava Naik: मराठी अभिनेत्री मनवा नाईक (Manava Naik) सोबत शनिवारी मुंबईत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मनवाला एका उबेर चालकाने (Uber Driver) धमकावले. यासंदर्भात अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट लिहून तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. मनवा नाईकने तिच्या अधिकृत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये मनवाने तिच्याबरोबर नेमकं काय घडलं हे सविस्तर सांगितलं आहे.

मनवा नाईकने आरोप केला आहे की, एका उबेर ड्रायव्हरने प्रवासादरम्यान केवळ तिच्याशी गैरवर्तन केले नाही तर तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. या पोस्टमध्ये मनवाने लिहिलं आहे की, हा प्रसंग शेअर करायलाच हवा. मी रात्री 8.15 च्या सुमारास उबर केली. मी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पोहोचलs तेव्हा उबर चालक फोनवर बोलत होता. मी त्याला फोनवर बोलू नकोस असे सांगितले. यानंतर त्यांनी बीकेसी येथील सिग्नल तोडला. मी पुन्हा एकदा त्याला असे करू नकोस असे सांगितले. पण त्याने माझे ऐकले नाही. (हेही वाचा - Mili Trailer Out: मायनस डिग्री तापमानात जीवनाची लढाई लढताना दिसली जान्हवी कपूर; अभिनेत्रीच्या 'मिली' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, Watch Video)

यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला अडवले. त्याचा फोटो क्लिक केला. मात्र, उबर चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर मी हस्तक्षेप केला. मी गाडीचा फोटो काढला आहे, त्यामुळे आता जाऊ द्या, असे मी पोलिसांना सांगितले. पण, यानंतर उबर चालक माझ्यावर भयंकर भडकला. त्याने मला तु 500 रुपये देणार आहे का? असं मोठ्या आवाजात विचारले. त्यावेळी मी त्याला म्हणाले की, तू फोनवर बोलत होतास. त्यानंतर त्याने पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी त्याने मला धमक्या दिल्या. थांब तू तुला दाखवतो, अशा शब्दात त्याने मला धमकावले.

मनवाने पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, या सर्व प्रकारानंतर मी त्याला गाडी पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी बीकेसीच्या जिओ गार्डन परिसरात एका अंधाऱ्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्याला गाडी परत पोलिस ठाण्यात घेऊन जा, असे सांगत होते. प्रवासादरम्यान तो माझ्याशी वाद घालत होता आणि वेगाने गाडी चालवत होता. त्यांनी पुन्हा एकदा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील कुर्ला पुलावर कार थांबविण्याचा प्रयत्न केला.

यानंतर उबर चालकाने काय करणार…थांब दाखवतोच आता, अशी धमकी दिली. पण नंतर मी उबेर सेफ्टीला कॉल केला. उबरच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी फोनवरून बोलत असतानाही तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. चुनाभट्टी रोडवर असलेल्या प्रियदर्शनी पार्कमध्ये गाडी पोहोचली तेव्हा हा सर्व प्रकार सुरू होता. त्यावेळी मी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. पण त्याने माझे ऐकले नाही. तेवढ्यात त्याने कोणालातरी फोन केला.

उबर चालक गाडी थांबवत नव्हता म्हणून मी ओरडायला सुरुवात केली. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला उबेरमधून बाहेर पडण्यास मदत केली. त्यांनी मला त्या गाडीतून बाहेर काढले. मी सध्या सुरक्षित आहे. मात्र या सर्व घटनेने मी नक्कीच घाबरले आहे, असंही मनवा नाईकने पोस्टमध्ये सांगितलं आहे. अभिनेत्रीने या पोस्टमध्ये मुंबई पोलिस, बीएमसीला टॅग केलं आहे. मनवा नाईकसोबत घडलेल्या प्रकारामुळे पुन्हा एकदा मुंबई शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.