Godavari Teaser: जितेंद्र जोशी याच्या गोदावरी सिनेमाची पहिली झलक; पहा टीझर
'गोदावरी' असे या सिनेमाचे नाव आहे.
नाटक, टीव्ही, सिनेमा, वेबसिरीज या सर्व माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा मराठी सिनेसृष्टीतील कसदार अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) आता निर्मिती क्षेत्रात आपले नशिब आजमावत आहे. 'गोदावरी' (Godavari) असे या सिनेमाचे नाव आहे. सिनेमाचा टीझर (Teaser) नुकताच प्रदर्शित झाला असून जितेंद्र जोशी ने तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. टीझर शेअर करताना जितेंद्रने लिहिले की, "तुम्हाला ऐकू येत असेल तर नदी बोलते तुमच्याशी.. गोदावरी.. पहिली झलक."
टीझरच्या सुरुवातीलाच गौरी-जितेंद्र, नीना कुळकर्णी, संजय मोने, विक्रम गोखले हे कलाकार खळखळून हसताना दिसत आहेत. घरातील आनंदाचा, शुभ प्रसंग असावा, असे मागील सजावट, एकंदर लूकवरुन लक्षात येते. त्यानंतर जितेंद्र जोशी हातात कप घेऊन एकटाच हरवल्यागत पाहताना दिसतो आणि मग नदीचे दुषित झालेले पाणी संथ वाहताना दिसते. या टीझरने सिनेमाच्या कथेविषयची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. (Betaal या नव्या वेबसीरीज मधून अभिनेता जितेंद्र जोशी पुन्हा Netflix India च्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला)
पहा व्हिडिओ:
गोदावरी सिनेमात गौरी नलावडे आणि जितेंद्र जोशी ही फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सिनेमात विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, सखी गोखले, प्रियदर्शन जाधव हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. जितेंद्र जोशीचे सामाजिक भान आणि जाण त्याच्या लेखनातून, कवितेतून वारंवार दिसून येते. त्यामुळे साहजिक जितेंद्र हाताळणारा सिनेमातून काहीतरी चांगले पाहायला मिळणार अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या सिनेमाचे दिग्दर्शन निखिल महाजन याने केले असून 1 मे रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.