10th Ajanta-Ellora International Film Festival: छत्रपती संभाजी नगरमध्ये 15 जानेवारीपासून अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; जगभरातील 65 चित्रपट दाखवले जाणार, पहा तपशील
हा चित्रपट महोत्सव 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान पाच दिवस चालणार आहे. यावेळी जगभरातून एकूण 65 गाजलेले चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात जगभरातील अनेक राष्ट्रे आणि कलाकार सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
10th Ajanta-Ellora International Film Festival: येत्या 15 जानेवारीपासून छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे 10 वा अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. आयोजकांनी याबाबत माहिती दिली. छत्रपती संभाजी नगर येथील पीव्हीआर आयनॉक्स, प्रोझोन मॉलमध्ये हा चित्रपट महोत्सव होणार आहे. अधिकृत घोषणेनुसार, हा चित्रपट महोत्सव 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान पाच दिवस चालणार आहे. यावेळी जगभरातून एकूण 65 गाजलेले चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात जगभरातील अनेक राष्ट्रे आणि कलाकार सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यासह महोत्सवाचे अध्यक्ष चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते होणार आहे.
भारतीय चित्रपट स्पर्धा श्रेणी-
कार्यक्रमाच्या पाच दिवसांदरम्यान, भारतीय चित्रपट स्पर्धा श्रेणीमध्ये अनेक भारतीय भाषांमधील नऊ चित्रपट प्रदर्शित केले जातील. पाच राष्ट्रीय स्तरावरील ज्युरी सदस्यांचे एक पॅनेल प्रेक्षकांसह चित्रपटांचे मूल्यांकन करेल. सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट पुरस्कार विजेत्याला 1 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह सुवर्ण कैलास पुरस्कार प्राप्त होईल. सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष/महिला) श्रेणींमध्ये तसेच सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी देखील पुरस्कार प्रदान केले जातील.
कोण आहेत ज्युरी?
भारतीय चित्रपट स्पर्धेच्या ज्युरीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा बिस्वास (गुवाहाटी) असतील. ज्युरी पॅनेलमध्ये ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सीके मुरलीधरन (मुंबई), ज्येष्ठ संपादक दीपा भाटिया (मुंबई), दिग्दर्शक जो बेबी (कोची) आणि पटकथा लेखक आणि अभिनेता गिरीश जोशी (मुंबई) यांचा समावेश आहे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (FIPRESCI) कडेही या महोत्सवासाठी एक विशेष ज्युरी असेल, ज्याचे अध्यक्ष शिलादित्य सेन (पश्चिम बंगाल) आणि जीपी रामचंद्रन (केरळ) यांच्यासह ज्येष्ठ लेखिका आणि चित्रपट समीक्षक लतिका पाडगावकर असतील. (हेही वाचा: Pune International Film Festival: यंदाच्या 23 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक बदलले; आता होणार 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान)
कालिया मर्दन पाहण्याची संधी-
महोत्सवाच्या 10व्या वर्षाच्या निमित्ताने, आयोजकांनी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी 105 वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला, कालिया मर्दन हा आयकॉनिक मूकपट प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे. तसेच यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात लेखक, पटकथा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक पद्मभूषण सई परांजप्ये यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान, अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मराठवाडा कला, संस्कृती आणि चित्रपट प्रतिष्ठान द्वारे आयोजित केला जातो आणि नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन आणि यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत करतो. याला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (FIPRESCI) आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया (FFSI) यांनी मान्यता दिली आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे तसेच महाराष्ट्र सरकारचेही त्याला समर्थन आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)