मराठी माणसाचं वस्त्रहरण करायला तात्या सरपंच आणि मंडळी पुन्हा रंगभूमीवर अवतरले
प्रसाद कांबळी ह्यांनी वस्त्रहरण हे अजरामर नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलं आहे.
'रसिक प्रेक्षकांका एक धोक्याची सूचना नाटक बघताना जेव्हा तुम्ही हाश्याल, तेव्हा तुमचा वस्त्रहरण झाला तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही हा.' असं म्हणत लोकांना हसायला लावणारं मराठी रंगभूमीवरचं अजरामर नाटक वस्त्रहरण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मालवणी भाषेला साता समुद्रापार पोहचवणारे मच्छिन्द्रनाथ कांबळी याचं वस्त्रहरण हे नाटक जेव्हा जेव्हा मराठी माणूस बघतो तेव्हा तेव्हा हसून हसून लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. गंगाराम गवाणकर ह्यांची दिमाखदार लेखणी, कै रमेश रणदिवे यांचं दिग्दर्शन आणि मच्छिन्द्रनाथ कांबळी यांनी साकारलेली तात्या सरपंचाची भूमिका हे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आणि आता प्रसाद कांबळी ह्यांच्या भद्रकाली प्रोडक्शनने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलं आहे.
दिगंबर नाईक, मंगेश कदम, समीर चौगुले, किशोरी आंबिये, रेशम टिपणीस, मयुरेश पेम, मनमीत पेम, देवेंद्र पेम, प्रणव रावराणे, प्रदीप पटवर्धन, अंशुमन विचारे, प्रभाकर मोरे, शशिकांत केरकर आणि नंदकिशोर चौगुले अशी तगडी स्टारकास्ट नाटकात आहे. विशेष म्हणजे तात्या सरपंचाची भूमिका दिगंबर नाईकने उत्तम रित्या साकारली आहे. विनोदाचं अचूक टाईमिंग त्यांनी साधलं असून अनेकदा जणू मच्छिन्द्रनाथ कांबळी स्टेजवर असल्याचा भास होतो. त्यासोबत किशोरी आंबिये काकूंच्या भूमिकेत आहेत. तालीम मास्टर म्हणून मंगेश कदम आणि समीर चौगुले धमाल आणतात. ह्या नाटकातली एक विशेष गोष्ट म्हणजे, पहिल्यांदाच पेम कुटुंबातले मयुरेश पेम, मनमीत पेम आणि त्यांचे बाबा देवेंद्र पेम हे एकत्रितपणे अभिनय करताना दिसत आहेत. भीमाच्या दमदार आणि भारदस्त भूमिकेला मनमीत शिवाय दुसरं कोण असणार! बेवड्या अर्जुनाची भूमिका अंशुमन विचारेने अगदी सहजपणे साकारली आहे. नाटकात इतके सगळे कलाकार असून सुद्धा प्रत्येक भूमिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून जाते.
मराठी रंगभूमीवरील सध्याची ही '6' दर्जेदार नाटकं पाहिलीत का ?
रेवंडी, ह्या कोकणातल्या एका गावात जेव्हा काही मंडळी द्रौपदी वस्रहरणावर नाटक बसवण्याचा ठरवतात आणि प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी जी धमाल उडते ते पाहून तालीम मास्टर आणि खुद्द तात्या सरपंचांना काय करावं हे सुचत नाही.नाटक सादर करताना पडद्यामागे आणि स्टेजवर सुद्धा कलाकारांची जी तारांबळ उडते ते पाहून प्रेक्षक खळखळून हसतात.मालवणी भाषेचा लहेजा आणि शिव्यांनाही प्रेक्षकांकडून खूप टाळ्या आणि हश्या मिळतात. आणि विशेष म्हणजे कुठेही vulgur वाटत नाही. मुळात मालवणी भाषेतच एक गोडवा असल्यामुळे प्रेक्षकांना संवाद ऐकताना हसू येतं.
राजकारणात एकमेकांचं वस्त्रहरण करणाऱ्या महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांना सुद्धा ह्या नाटकाने भुरळ घातली आहे. वस्रहरणाच्या ५००० व्या प्रयोगाला राज ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, दिवंगत नेते विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे ह्यांनी हजेरी लावली होती आणि नाटकाची मज्जा लुटली होती. तेव्हा सुद्धा शेलक्या शब्दात ह्या नेते मंडळींनी एकमेकांवर वस्त्रहरण केलं होतं. लवकरच ह्या नाटकाचा प्रयोग क्रमांक ५२२५ होणार असून प्रत्येक प्रयोग हाउसफ़ुल्ल झाला आहे. असे किती प्रेक्षक आहेत ज्यांनी हे नाटक १०-१५ वेळा सुद्धा पाहिलं आहे. हे अजरामर नाटक 10,000 प्रयोगाचा टप्पा गाठो हीच देवी भद्रकाली आणि रामेश्वराचरणी प्रार्थना. तुम्ही अजून जर हे नाटक पाहिलं नसेल तर आपल्या जवळच्या नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग जरूर बघा.