The Vaccine War: विवेक अग्निहोत्रीने केली 'द व्हॅक्सिन वॉर' नावाच्या नव्या चित्रपटाची घोषणा; पहिल्यांदाच 11 भाषांमध्ये एकाच वेळी होणार प्रदर्शित
2023 मध्ये हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, मराठी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, पंजाबी आणि भोजपुरी या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल.
काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर आधारित 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाच्या अफाट यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीची (Vivek Agnihotri) लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. आता त्याने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) असे या चित्रपटाचे नाव आहे. विवेक अग्निहोत्रीने आज (10 नोव्हेंबर 2022) त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'द व्हॅक्सिन वॉर' चे पहिले लूक पोस्टर शेअर केले.
याबाबत माहिती देताना विवेक अग्निहोत्रीने लिहिले की, ’सादर करत आहोत, द व्हॅक्सिन वॉर'- भारताने आपले विज्ञान, धैर्य आणि महान भारतीय मूल्यांसह लढून जिंकलेल्या आपल्याला माहित नसलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय सत्य कथा. पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट 11 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कृपया आम्हाला तुमचे आशीर्वाद द्या.’
दुसर्या पोस्टमध्ये, दिग्दर्शकाने सांगितले की, भारतीय चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच 11 भाषांमध्ये एकाच वेळी चित्रपट प्रदर्शित होत आहे. भारतीय चित्रपट उद्योगाला एकत्र आणण्याचा त्यांचा हा नवा उपक्रम आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर लसीची बाटली दिसत आहे. या विवेक अग्निहोत्री लिखित आणि पल्लवी जोशी निर्मित चित्रपट आहे. (हेही वाचा: 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या टीजरमुळे नव्या वादाला सुरुवात; डीजीपींनी दिले FIR नोंदवण्याचे निर्देश, जाणून घ्या सविस्तर)
विवेकची पत्नी पल्लवी जोशी 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटाची निर्मिती करत आहे. 2023 मध्ये हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली, मराठी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, पंजाबी आणि भोजपुरी या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होईल. दरम्यान, द काश्मीर फाइल्ससाठी विवेकला देशभरातून प्रचंड पाठिंबा मिळाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटावर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण अग्निहोत्रीच्या कारकिर्दीतील हा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला.