Sonu Sood Temple: चाहत्यांनी कृतज्ञता म्हणून बांधले सोनू सूदचे मंदिर; अभिनेत्याने दिली 'ही' प्रतिक्रिया
या मंदिरात सोनू सूदची मूर्ती बसविण्यात आली आहे. हे मंदिर रविवारी 20 डिसेंबर रोजी उघडण्यात आले आहे.
कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हजारो स्थलांतरित कामगार केवळ बेरोजगारच झाले नाहीत, तर त्यांना घरी जाण्यासाठीही अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. अशावेळी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला होता, त्यामधील एक महत्वाचे नाव होते अभिनेता सोनू सूद (Sonu Sood). लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सोनू सूदने अनेकांना मदत केली आहे. त्याने फक्त या प्रवासी मजुरांची घरी जाण्याचीच व्यवस्था केली नाही तर, त्यांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली. आता सोनूच्या चाहत्यांनी कृतज्ञता म्हणून चक्क त्याचे मंदिर (Sonu Sood Temple) बांधले आहे.
तेलंगानाच्या (Telangana) सिद्दीपेट जिल्ह्यातील डुब्बा टांडा (Dubba Tanda) गावच्या लोकांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने सोनू सूद याच्या सन्मानार्थ मंदिर बांधले आहे. या मंदिरात सोनू सूदची मूर्ती बसविण्यात आली आहे. हे मंदिर रविवारी 20 डिसेंबर रोजी उघडण्यात आले आहे. या मंदिरात स्थानिक लोकांनी सोनू सूद याच्या मूर्तीची आरतीही केली. इतकेच नाही तर पूजेच्या वेळी स्थानिक महिलांनी पारंपारिक पोशाख परिधान करून लोकगीतेही गायली.
जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडल रेड्डी म्हणाले की, कोरोना आपत्तीच्या वेळी सोनू सूदने लोकांना खूप मदत केली होती, म्हणून त्यांचे स्थान देवासारखे आहे व म्हणूनच सोनूचे मंदिर उभारण्यात आले. सोनू सूदची मूर्ती तयार करणारे मधुसूदन पाल म्हणाले की, सोनूने लोकांना मदत करून अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. सोनूने आपल्याही हृदयात स्थान निर्माण केल्याचे पाल म्हणाले. त्यांनी फक्त एक छोटी मूर्ती बनविली आहे जी सोनू सूदसाठी भेट आहे. (हेही वाचा: गरजूंच्या मदतीसाठी सोनू सूदची नवी योजना; स्वावलंबी बनण्यासाठी मोफत देणार ई-रिक्षा)
आपले मंदिर उभारण्यात आल्याची बातमी समजताच सोनू सूदने ट्विटरवर भावनिक पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये सोनू म्हणतो, ‘मी याच्या पात्र नाही.’ दरम्यान, आता कोविड संकटात गरजूंना मदत करण्यासाठी सोनू सूदने पुढाकार घेतला आहे, ज्या अंतर्गत या साथीच्या रोगाच्या काळात ज्या लोकांनी आपली नोकरी गमावलेली आहे त्यांना मोफत ई-रिक्षा (E-Rickshaws) दिली जाणार आहे.