'तानाजी' चित्रपटाबाबत उसळला नवा वाद; संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवत मागितले 'या' प्रश्नांबाबत स्पष्टीकरण
एकीकडे चित्रपटाची भव्यता, लुक्स, इफेक्ट्स यांची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. चित्रपटामधील काही गोष्टींबाबत त्यांनी आक्षेप घेतला असून, त्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
अजय देवगण याचा बहुप्रतीक्षित ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ (Tanhaji: The Unsung Warrior) चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित करण्यात आला. एकीकडे चित्रपटाची भव्यता, लुक्स, इफेक्ट्स यांची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. चित्रपटामधील काही गोष्टींबाबत त्यांनी आक्षेप घेतला असून, त्याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. हा सिनेमा दाखविल्याशिवाय प्रदर्शित करू नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. अशाप्रकारे प्रदर्शनाआधी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
ट्रेलरमधील एका शॉटमध्ये शिवाजी महाराजांवर कोणी साधू लाकूड फेकताना दाखवली गेली आहे. ही व्यक्ती नक्की कोण आहे? आणि हा कोणता प्रसंग आहे असा सवाल उपस्थित होत आहे. असा चुकीचा इतिहास जनतेसमोर जावू नये अशी संभाजी ब्रिगेडची इच्छा आहे. संभाजी ब्रिगेडने हे दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. तसेच अभिनेत्री काजोलच्या तोंडी जे संवाद आहे तेही आक्षेपार्ह आहेत. शिवाजी महाराजांची गो-ब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी परत जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे, आणि ते योग्य नाही.
ट्रेलरमधील एका शॉटमध्ये भगव्या झेंड्यावर ॐ दाखवले आहे. यावरून महाराज सर्वधर्मसमावेशक नव्हते असा अर्थ प्रतीत होऊ शकतो. तर अशा काही मुद्द्यांवर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. सिनेमा दाखविल्याशिवाय प्रदर्शित करु नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर देऊ असा इशारही संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिला आहे. (हेही वाचा: Tanhaji Trailer: अजय देवगण, सैफ अली खान यांच्या दिमाखदार अंदाजातील 'तानाजी' सिनेमाचा ट्रेलर आऊट)
दरम्यान, चित्रपटात अजय देवगण तानाजी मालुसरेंच्या, तर अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) उदयभानची भूमिका सकारात आहे. अभिनेत्री काजोल (Kajol) ही तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत आहे. 10 जानेवारी 2020 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.