#MeToo नाना पाटेकर यांच्याकडून राज्य महिला आयोगाला ३ पानांचे उत्तर म्हणाले 'यापेक्षा अधिक मी सांगू शकत नाही!'
या अभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही आरोप केला आहे.
#MeToo मोहिमेअंतर्गत झालेल्या आरोपानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य महिला आयोगाला तब्बल तीन पानांचे उत्तर पाठवले आहे. या उत्तरात आपल्यावर झालेले सर्व आरोप हे निराधार आहेत. या प्रकरणी पोलीसांत तक्रार दाखल झाली आहे. पोलीस प्रकरणाचा तपासही करत आहेत. त्यामुळे त्याबाबत मी अधिक काही सांगू शकत नाही, असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.
३४ वर्षीय अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केला आहे की, २००८ मध्ये 'हॉर्न ऑके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न झाला. या अभिनेत्रीने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. मात्र, मध्येच तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही आरोप केला. या आरोपात तिने राज ठाकरे यांना बाळासाहेबांचे उत्तराधिकारी व्हायचे होते पण, त्यात त्यांना यश आले नाही, असे म्हटले होते. तसेच, मनसे हा एक गुंडांचा पक्ष असल्याचा आरोपही या अभिनेत्रीने केला होता.
दरम्यान, या अभिनेत्रीने २००८मध्ये ''हॉर्न ओके प्लीज'च्या सेटवर तिच्यावर झालेला कथीत हल्ला आणि गाडीची तोडफोड यात मनसेच्या कार्यकर्त्यांचा हात होता असाही आरोप केला आहे. तिला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या आल्या. तसेच, जबरदस्तीने त्यांनी तिच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप या अभिनेत्रिने केला आहे. (हेही वाचा, Housefull 4 मधून नाना पाटेकर आऊट, 'बेबी'नंतर अक्षय कुमार आणि राणा दग्गुबाती पुन्हा एकत्र)
#MeToo मोहिमेमध्ये सहभागी होत अनेक महिलांनी आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक गैरवर्तन आणि अन्यायाचे वेदनादाई अनुभव कथन केले आहेत. त्यामुळे अनेक तथाकथीत प्रसिद्ध, सभ्य आणि दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक मंडळींच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.