Pornography Racket: ईडीला आढळला नाही Raj Kundra आणि पोर्नोग्राफी रॅकेटमध्ये कोणताही थेट संबंध; आता मनी ट्रेल आणि शेल कंपन्यांची होणार चौकशी
कुंद्रा त्या वर्षी फेब्रुवारी ते डिसेंबरपर्यंत त्या कंपनीचा भाग होता. यादरम्यान कंपनीने हॉटशॉट अॅप तयार केले होते.
उद्योगपती राज कुंद्राबाबत (Raj Kundra) एक मोठी माहिती समोर आली आहे. राज कुंद्रा 2021 मध्ये एका अश्लील चित्रपट प्रकरणात (Pornography Racket) अडकला होता, त्यानंतर त्याला अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी कथित पोर्नोग्राफी रॅकेटबाबत त्याच्यावर आरोप केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मे 2022 मध्ये या प्रकरणाशी निगडीत मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला होता. आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. ईडीला राज कुंद्रा आणि पॉर्नोग्राफी रॅकेटमध्ये कोणताही थेट संबंध सापडलेला नाही.
कुंद्राचा या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचे अंमलबजावणी संचालनालयाला त्यांच्या तपासात आढळून आले. ईडी सध्या पैशांच्या व्यवहारांची चौकशी करत आहे. इंग्लंडची कंपनी केनरिन आता ईडीच्या रडारवर आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार कुंद्रा हा हॉटशॉट नावाच्या अॅपचा मालक होता. या अॅपवर अश्लील चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इंडस्ट्रीतील काही महिला कलाकारांनी पुढे येऊन राजविरोधात वक्तव्ये केली होती. यानंतर कुंद्राला अटक करण्यात आली आणि तो सुमारे 2 महिने आर्थर रोड जेलमध्ये राहिला.
बातम्यांनुसार, आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड (APML) चे संस्थापक सौरभ कुशवाह यांनी कुंद्रा यांना 2019 मध्ये त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले होते. कुंद्रा त्या वर्षी फेब्रुवारी ते डिसेंबरपर्यंत त्या कंपनीचा भाग होता. यादरम्यान कंपनीने हॉटशॉट अॅप तयार केले होते. यानंतर केनरीनने हे अॅप सुमारे 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. मात्र, कुंद्राची कंपनी विहान आणि केनरिन यांनी संयुक्तपणे त्याची देखभाल केली. (हेही वाचा: 'नशेत' व्हायरल झालेल्या व्हिडिओवर Sunny Deolची प्रतिक्रिया, म्हणाला- अफवाहों का 'सफर' बस यहीं तक)
केनरीन ही हॉटशॉट अॅपचे अधिकृत प्रवर्तक आणि राज कुंद्राचा मेहुणा प्रदीप बक्षी याच्या मालकीची कंपनी आहे. ही कंपनी भारतातील शेल कंपन्यांसोबत अनेक व्यवहारांमध्ये गुंतलेली आहे. रिपोर्ट्सनुसार, ईडी आता इंग्लिश कंपनी केनरिनशी जोडलेली बँक खाती आणि त्यांच्यामार्फत झालेल्या व्यवहारांची चौकशी करत आहे.